(दापोली /रत्नागिरी)
दापोलीतील बीएसएनएल कार्यालयाच्या सुरक्षिततेला चोरट्यांनी आव्हान दिल्याची घटना समोर आली आहे. कार्यालयातील ओसी लॅन रूमच्या विंडो एसीचा दरवाजा बाहेरून तोडून चोरट्याने आत प्रवेश केला आणि सुमारे सात हजार रुपये किमतीची डीसी केबल लंपास केली. ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दापोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बीएसएनएल कार्यालयाशी संबंधित विजय राम मीना (वय ३५, रा. नम्र विलास भवन, बँक ऑफ महाराष्ट्रशेजारी, आझाद मैदान, दापोली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बीएसएनएल कार्यालयातील ओसी लॅन रूमच्या विंडो एसीचा दरवाजा बाहेरून तोडून उचकटला. दरवाजा तोडल्यानंतर चोरट्याने रूममध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर तेथील निळ्या व लाल रंगाची सुमारे सात हजार रुपये किमतीची डीसी केबल चोरी करण्याच्या उद्देशाने लबाडीने लंपास केली. कार्यालयातील साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
तपासादरम्यान या प्रकरणात विशाल परशुराम सर्वे (वय ३०, रा. सडवे सुतारवाडी, ता. दापोली) याच्यावर संशय आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गु.र.नं. २०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३), ३०५(ई) तसेच भादंवि कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास दापोली पोलिस करीत आहेत.
कार्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
बीएसएनएलसारख्या महत्त्वाच्या दूरसंचार कार्यालयाच्या संरक्षित कक्षात खिडकीचा दरवाजा तोडून चोरट्याने प्रवेश केल्याने कार्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ सात हजार रुपयांच्या केबलपुरती ही चोरी मर्यादित आहे की, कार्यालयातील अन्य साहित्याचीही पाहणी करण्यात आली होती, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


