( खेड )
तालुक्यातील खोपी परिसरात बुधवारी (दि. २७) दुपारी घडलेल्या दुर्घटनेत म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा धरणातील चिखलात रुतून मृत्यू झाला. बाबाराम मालसिंग ढेबे (वय ३६, रा. रामजीवाडी, खोपी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबाराम ढेबे हे नेहमीप्रमाणे दुपारी सुमारे १२.२५ वाजता आपल्या म्हशींना घेऊन पिंपळवाडी येथील खेड धरणाकडे गेले होते. धरणातील पाण्यात म्हशींना उतरविताना त्यांचे पाय अचानक चिखलात खोलवर रुतले. स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करताना त्यांचे संतुलन बिघडले आणि ते पाण्यात कोसळून बुडू लागले.
दरम्यान, ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सुमारे २.३० वाजता ढेबे यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या बाबत खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

