(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वर्षानुवर्षे नादुरुस्त अवस्थेत असलेल्या नदीवरील साकवाच्या दुरुस्तीसाठी शासन-प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही काम मार्गी लागत नसल्याने अखेर कळझोंडी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांनी एकत्र येत आर्थिक नियोजन केले आणि कळझोंडी-कुंभवणे वाडी येथील नदीवरील रखडलेला साकव लोकसहभागातून पूर्ण केला. ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि सामूहिक प्रयत्नांचे हे उदाहरण परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.
कळझोंडी गावातील नदीवर असलेला हा साकव गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरुस्त होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. साकव नव्याने बांधण्यात यावा, यासाठी ग्रामस्थांकडून शासन व प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, अपेक्षित पातळीवर काम पुढे सरकत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर ‘प्रशासनाच्या प्रतीक्षेपेक्षा लोकसहभागातूनच मार्ग काढूया’, असा निर्णय घेतला. त्यानंतर ग्रामस्थांनी स्वतः आर्थिक नियोजन करून साकवाच्या कामाला सुरुवात केली. सामूहिक सहभाग, नियोजन आणि परस्पर सहकार्याच्या बळावर अखेर हे काम पूर्णत्वास गेले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला ग्रामस्थांनी स्वतःच्या प्रयत्नांतून मार्ग काढला आहे.
साकवाचे काम पूर्ण झाल्यानंतर आनंदमय वातावरणात उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या वेळी उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याचा मनस्वी आनंद असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाला परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांची एकजूट असेल तर सामूहिक प्रयत्नांतून विकासकामे उभी राहू शकतात, याचे कळझोंडीतील साकव हे जिवंत उदाहरण ठरले आहे. शासन-प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा असतानाच, एखादे काम दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यास ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यासाठी पुढाकार घेण्याची सकारात्मक दिशा या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे.


