(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
घरातील कार्यक्रमासाठी दागिना हवा असल्याचे सांगून विश्वास संपादन करत एका महिलेने तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र मागून नेले. मात्र, वारंवार विचारणा करूनही ते परत न केल्याने संबंधित महिलेविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंगळसूत्राची किंमत सुमारे १ लाख ८० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत सौ. दर्शना दिलीप सावंत (वय ५९) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्या सध्या साडवली येथील मार्लेश्वर हेरिटेज रो हाउस येथे भाड्याने वास्तव्यास आहेत. तक्रारीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला त्यांच्या घरी आली.
घरातील परिचयाचा आणि विश्वासाचा फायदा घेत तिने तिच्या घरी कार्यक्रम असल्याचे सांगितले. त्यासाठी मंगळसूत्राची आवश्यकता असल्याचे सांगून सावंत यांच्याकडे असलेले जुन्या वापरातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र मागून घेतले. विश्वास असल्याने सावंत यांनी ते मंगळसूत्र तिच्याकडे दिले. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतरही मंगळसूत्र परत मिळाले नाही. सावंत यांनी संबंधित महिलेकडे वारंवार विचारणा करून दागिना परत करण्याची मागणी केली. तरीही मंगळसूत्र परत करण्यात आले नसल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
तक्रारीनुसार, अपहृत सोन्याचे मंगळसूत्र तीन तोळ्यांचे असून त्याची अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी अंकिता केशव पालव (वय अंदाजे ३२, रा. मार्लेश्वर हेरिटेज अपार्टमेंट, साडवली; मूळ रा. बिळवस, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१६(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. विश्वास संपादन करून मौल्यवान दागिना ताब्यात घेणे आणि तो परत न केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमेश्वर पोलिसांकडून करण्यात येत आहे.


