(रत्नागिरी / प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार रत्नागिरीसह चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला व्यक्ती हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून रत्नागिरी शहरात आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मदताहिर इब्राहिम मस्तान (वय ३६, रा. घर नं. ३९२१, वरचा मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) याला उपविभागीय दंडाधिकारी, उपविभाग रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ (१) (अ) अन्वये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला होता. हा आदेश संबंधितास १२ जुलै २०२६ रोजी बजावण्यात आला होता. हद्दपारीच्या कालावधीत या चार जिल्ह्यांच्या हद्दीत वास्तव्य न करण्याचे आदेश असतानाही तो रत्नागिरी शहरात आढळून आल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.
१० सप्टेंबर रोजी रात्री ९.४६ वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना मांडवी ते पेठकिल्ला जाणाऱ्या रस्त्यावर अलहंम पार्कसमोर आरोपी आढळून आला. हद्दपारीचा आदेश अस्तित्वात असतानाही संबंधित व्यक्ती रत्नागिरीत आढळल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली. याप्रकरणी फिर्यादी गणेश राजेंद्र सावंत (वय ३६, पोलीस हेड कॉन्स्टेबल/३०६, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी) यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १४१ आणि १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हद्दपारीचा आदेश देऊनही संबंधित व्यक्ती जिल्ह्याच्या हद्दीत आढळून आल्याने पोलिसांच्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून आता अधिक कठोरपणे नजर ठेवली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.


