(खेड/ रत्नागिरी)
औषधोपचारासाठी दुचाकीवरून जात असलेल्या महिला आणि दुचाकीस्वाराला मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील वळणावर घडली. या अपघातात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली असून दुचाकीस्वाराच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालक वाहनासह घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हा अपघात ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.०२ वाजता चिपळूणहून खेडच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटातील वळणावर घडला. याप्रकरणी किरण संजय जंगम (वय ३८, रा. खोपी, श्रीरामनगर, ता. खेड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे आतेभाऊ संकेत चंद्रकांत जंगम हे त्यांच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटारसायकल क्रमांक एमएच-०८-बीए-११५३ वरून जात होते. त्यांच्या मागे आत्या निलम चंद्रकांत जंगम (वय ५२, रा. पिरलोटे, साई मंदिराशेजारी, ता. खेड) या बसल्या होत्या. दोघेही खेड येथील डॉ. साळुंखे यांच्या दवाखान्यात औषधोपचारासाठी जात होते.
दरम्यान, भोस्ते घाटातील वळणावर त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या व्हॅगनर कार क्रमांक एमएच-०६-सीयू-०८४३ ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील निलम जंगम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. संकेत जंगम यांच्या डाव्या पायाला मुकामार लागला असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर कारचालक निलेश भगवान मोरे (वय ३४, रा. कोळोसे, ता. महाड, जि. रायगड) हा कार घेऊन घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील ई-साक्ष अँपचा वापर करण्यात आल्याची नोंदही पोलिसांनी केली आहे.


