(देवळे / प्रकाश चाळके)
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी आपल्या कलेतून विठ्ठलभक्तीचे अनोखे दर्शन घडवले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी सावळ्या विठ्ठलाच्या विविध आकर्षक रांगोळ्या साकारत भक्ती आणि कलेचा सुंदर संगम घडवून आणला आहे.
यंदा त्यांनी विशेष संकल्पना राबवत नदीकाठच्या मऊ मातीपासून एक छोटी वीट तयार केली. ती भाजून पक्की केल्यानंतर अवघ्या एका तासात त्या विटेवर रांगोळीच्या माध्यमातून श्री पांडुरंगाची देखणी प्रतिमा साकारली. या आगळ्यावेगळ्या कलाकृतीने विठ्ठलभक्त आणि कलाप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
या कलाकृतीकडे पाहताना सहजच शब्द उमटतात… “कलेला लाभला भक्तीचा स्पर्श, विटेवरी अवतरला माझा पांडुरंग.”
विलास रहाटे हे दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वेगवेगळ्या माध्यमांतून विठ्ठलाची प्रतिमा साकारत असतात. यापूर्वी त्यांनी तुळशीच्या पानावर, मोरपिसावर तसेच पाण्याखाली रांगोळीतून विठ्ठलाची प्रतिमा साकारून आपल्या कलाकौशल्याची वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींना राज्यभरातून मोठी दाद मिळाली होती.
यंदा विटेवरील रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली श्री पांडुरंगाची प्रतिमा ही त्यांच्या भक्तिभाव आणि कलात्मकतेचा आणखी एक उत्कृष्ट आविष्कार ठरली असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
फोटो : विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी विटेवर रांगोळीतून साकारलेली श्री पांडुरंगाची आकर्षक प्रतिमा.

