(संगमेश्वर / प्रतिनिधी)
अवकाळी पाऊस आणि बेभरवशी हवामानामुळे यंदाच्या हंगामात आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आधीच संकटात सापडलेल्या बागायतदारांना आता नुकसानभरपाईसाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे तालुक्यातील सुमारे ६० टक्के नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप ऑनलाइन प्रणालीबाहेर असल्याचे समोर आले असून, भरपाईची प्रक्रिया रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पंचायत समितीने जून महिन्यातच तालुक्यातील सुमारे दोन हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तहसील कार्यालयाकडे सुपूर्द केली होती. तालुक्यातील एकूण सुमारे चार हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती महसूल, कृषी आणि संबंधित यंत्रणांच्या संयुक्त पाहणीनंतर तयार करण्यात आली होती. मात्र, जवळपास दोन महिने उलटूनही या यादीपैकी केवळ ४० टक्के माहितीच ऑनलाइन प्रणालीवर नोंदविण्यात आली असून, उर्वरित ६० टक्के शेतकरी अद्याप भरपाई प्रक्रियेपासून वंचित आहेत. यादी तातडीने अपलोड व्हावी, यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागातील कर्मचारी दररोज तहसील कार्यालयात पाठपुरावा करत आहेत. मात्र, संबंधित लिपिकाकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याने प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आर्थिक मदतीची अपेक्षा बाळगून बसलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अधिकच लांबत आहे.
या प्रकाराची दखल घेत पंचायत समितीचे उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनी बुधवारी तहसीलदार अमृता साबळे यांच्याशी थेट संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या अडचणींची सविस्तर कल्पना दिल्यानंतर तहसील प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित लिपिकाकडील काम गुरुवारी दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे सोपविले. त्यानंतर यादी ऑनलाइन अपलोड करण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचे सांगण्यात येत आहे. नुकसानभरपाईची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उर्वरित यादी तातडीने प्रणालीवर नोंदवून भरपाईची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी बागायतदारांकडून होत आहे.

