(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्यातील ताम्हाणे गावातील संजय गणपत पांचाळ (वय ३५) यांचा काम करत असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी घडली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांचाळ हे पितांबरी कंपनीच्या सुर्वे प्लॉटवर काम करत होते. आज (बुधवारी) सकाळी सुमारे १०.५५ वाजता काम सुरू असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. हा प्रकार लक्षात येताच तेथे उपस्थित असलेले संदेश संतोष कारेकर यांनी इतर नागरिकांच्या मदतीने पांचाळ यांना तातडीने उपचारासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
संजय पांचाळ यांना गेल्या दोन वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता. त्यासाठी त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू होते. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकणार आहे.
संजय पांचाळ यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांची मोठी मुलगी पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असून, मुलगा ताम्हाणे येथील मराठी शाळेत शिकत आहे. अवघ्या ३५ व्या वर्षी संजय पांचाळ यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


