(देवरूख)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील केतकर गल्लीमध्ये बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 7 लाख 62 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घरमालक सुबोध मोरेश्वर जोगळेकर यांनी देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी सुबोध जोगळेकर हे व्यवसायाने वकील असून सध्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात वास्तव्यास आहेत. कोंडगाव येथील त्यांचे घर अनेक दिवस बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी 31 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत ही घरफोडी केल्याचे तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी जड हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर देवघर आणि बेडरूममधील कपाटांचे लॉकर फोडून 5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 1 लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये 15 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन यांचा समावेश आहे. तसेच सुमारे 300 ग्रॅम वजनाचे चांदीचे गोळेही चोरीस गेले आहेत.
चोरट्यांनी केवळ रोकड व दागिन्यांवरच नव्हे, तर घरातील तांब्या-पितळेची जुनी भांडी, स्टीलची भांडी, गॅस सिलेंडर, शिलाई मशीनचा भाग आणि पाण्याची मोटरही लंपास केली. विशेष म्हणजे सुमारे 400 किलो वजनाची तांब्याची भांडी, ज्यामध्ये कळशा, बादल्या, हंडे व तामण यांचा समावेश आहे, तसेच मोठे पितळी समयदेखील चोरीस गेले आहेत.
याशिवाय घरातील संगणक, प्रिंटर, इन्व्हर्टर आणि महत्त्वाचा डेटा असलेल्या चार हार्ड डिस्क चोरट्यांनी पळवून नेल्या. शेतीसाठी वापरण्यात येणारी कुऱ्हाड, कुदळ, फावडे आणि विळे यांसारखे लोखंडी साहित्यही चोरीस गेले आहे.
घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम 331(3), 331(4) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध सुरू आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या मोठ्या घरफोडीमुळे कोंडगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

