(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
माखजन–आरवली मुख्य रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी पोखरलेला आहे. हा रस्ता पंचक्रोशीतील सुमारे २२ गावांचा संपर्क मार्ग असून, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (सा.बां.विभाग) लक्ष जात नसल्याची ग्रामस्थांची तीव्र भावना आहे.
या रस्त्यावर कोंडीवरे, बुरंबाड परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून त्यात चिखल व पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या अनेक ठिकाणी पूर्णपणे नष्ट झाल्या असून, बाजूची माती वाहून गेल्याने गाड्यांना क्रॉस करताना अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरून शाळकरी मुले सायकलने प्रवास करतात तसेच एस.टी.ची वाहतूकही नियमित सुरू असते. रस्त्यावरील खडी पसरल्यामुळे सायकल घसरून अपघात होण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. काही ठिकाणी दुचाकीस्वारही आडवे झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. किरकोळ अपघातांची नोंद कुठे होत नसली, तरी अशा घटनांची संख्या मोठी असून, रहदारी करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सव काही आठवड्यांवर आले आहेत. या काळात कोकणात चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होतात. माखजन पंचक्रोशीत प्रवेशासाठी आरवली रस्ता हा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाळ्यात रस्त्यांची खड्डेमय अवस्था नवी नाही, पण अपघात झाल्यानंतरच प्रशासन हलते, ही नेहमीची तक्रार याहीवेळी ऐकायला मिळत आहे. “सतत घसरणाऱ्या, किरकोळ जखमी होणाऱ्यांकडे कुणीच लक्ष देत नाही,” अशी प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली. तातडीने पावसाच्या सुसंधीत रस्त्याची डागडुजी करावी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सध्या पंचक्रोशीतील नागरिकांकडून होत आहे.