( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मिऱ्या-नागपूर महामार्गावरील हातखंबा तिठा परिसरामध्ये महामार्ग प्राधिकरणाचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक कारभार समोर आला आहे. महामार्गाच्या प्रोजेक्ट प्लॅननुसार पाणी जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोऱ्यांमध्ये (Culverts) चक्क मातीचा भराव टाकून रस्ता तयार करण्याचा प्रताप एका खाजगी जमीनधारकाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांना कोणतीही कल्पना नसून, प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हे बेकायदेशीर काम राजरोसपणे सुरू असल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
हातखंबा तिठा परिसरातील कांबळे यांच्या वस्तीजवळून हा बायपासमार्ग जातो. पावसाचे व इतर पाणी वाहून जाण्यासाठी प्राधिकरणाने महामार्गावर मोठी मोरी मंजूर केली आणि ती बांधलीही. मात्र, आता एका खाजगी प्रॉपर्टीधारकाच्या मनमानीमुळे या मोरीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. थेट जेसीबी मशीन लावून या मोरीमध्ये माती ढकलली जात आहे आणि पाणी जाण्याचा मार्ग बंद करून स्वतःचा खाजगी रस्ता बनवण्याचा घाट घातला जात आहे. हा सगळा प्रकार सुरू असताना “महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी नेमके करतात काय?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. प्राधिकरणाचे कोट्यवधींचे प्रोजेक्ट प्लॅन फक्त कागदावरच मर्यादित राहणार का, असा प्रश्न यावरून निर्माण झाला आहे.
या धक्कादायक प्रकाराबाबत जेव्हा महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी हात वर केले. “आमच्याकडून अशी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, तसेच तिथे आमचे कोणतेही काम सुरू नाही,” असे सांगून त्यांनी जबाबदारी झटकली आहे. दुसरीकडे, महामार्ग प्राधिकरण विभागाचे भू-संपादन अधिकारी अनिल सिंग यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही आपल्याला या प्रकाराबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. माहिती घेऊन सांगतो असे देखील त्यांनी सांगितले आहे. जर प्राधिकरणाच्या आणि ठेकेदाराच्या नाकदुऱ्यांखाली एवढा मोठा प्रकार घडत असेल आणि त्यांना याची गंधवार्ताही नसेल, तर या अधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक उरला आहे का? की खाजगी भूमाफियांना अधिकाऱ्यांचे छुपा पाठबळ आहे? अशी शंका घेण्यास आता वाव निर्माण झाला आहे.
मोरीमध्ये अशा प्रकारे अनधिकृत भराव टाकल्यास पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार कसा? पाण्याचा मार्गासाठी तयार करण्यात आलेली मोरी खाजगी मालमत्ता नेमकी कधी झाली? खाजगी प्रॉपर्टीधारकांच्या मनमानीसाठी स्थानिक जनतेला वेठीस धरले जात आहे. हा भुयारी मार्ग आहे की खाजगी प्रॉपर्टीधारकांची मक्तेदारी? हातखंबा येथील या गंभीर प्रकारानंतर आता संपूर्ण लक्ष “संबंधित विभाग तात्काळ कारवाई काय करणार?” या एकाच प्रश्नाकडे लागले आहे. स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाच्या या ढिम्म कारभारावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी आता या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


