(मुंबई / वृत्तसंस्था)
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांचे आज (बुधवारी, २८ ऑक्टोबर) रोजी संध्याकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा सखोल अभ्यास करून त्यांचे विश्लेषण करणारे पत्रकार म्हणून आसबे यांची ओळख होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रताप आसबे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दादर पार्कमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रताप आसबे यांनी तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत योगदान दिले. महाराष्ट्राच्या राजकारणाची त्यांना सखोल जाण होती. राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणातील घडामोडींचा अभ्यास करून त्यांनी आपल्या लेखनातून विविध विषयांचे विश्लेषण केले. राजकीय घटनांचे केवळ वृत्तांकन करण्यापुरते मर्यादित न राहता, त्या घटनांमागील पार्श्वभूमी, बदलते राजकीय प्रवाह, संघर्ष आणि त्यांचे समाजजीवनावर होणारे परिणाम उलगडून दाखवण्यावर त्यांचा भर होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी झालेल्या नामांतराच्या चळवळीत त्यांनी तुरूंगवासही भोगला होता. त्यानंतर नवशक्ती आणि प्रदीर्घ काळ महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रातून त्यांची पत्रकारिता गाजली. ‘महाराष्ट्र देशी’ हे त्यांचे सदर राज्यातील राजकीय घडामोडींचा एक आरसाच होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ते विश्वस्तही होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी साडेआठ ते साडेदहा ह्या कालावधीत वांद्रे पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
त्यांच्या राजकीय विश्लेषणात अभ्यासपूर्ण मांडणी आणि ऐतिहासिक संदर्भांना विशेष महत्त्व होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींची सखोल माहिती असल्याने अनेक पत्रकारांसाठी ते मार्गदर्शक ठरले. १९९० च्या दशकात त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना राजकीय पत्रकारितेचे धडे दिले. राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी किंवा ऐतिहासिक संदर्भ जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे विश्वासाने पाहिले जात असे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ब्लॉगवरूनही त्यांनी राजकीय आणि सामाजिक विषयांवर लेखन केले. पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर झाला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप आसबे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. राजकारणाचा समाजजीवनावर होणारा परिणाम आपल्या विश्लेषणातून मांडणारे पत्रकार म्हणून आसबे यांची पत्रकारिता सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा सखोल अभ्यास हे आसबे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. राजकीय घटनांचे समाजजीवनावर होणारे परिणाम, बदलते राजकीय प्रवाह, संघर्ष आणि लोकशाही प्रक्रियेचे त्यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटाचा सखोल अभ्यास असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याने पत्रकारिता क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. तसेच, आसबे यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रताप आसबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास असलेला एक चांगला पत्रकार गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आसबे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले. राजकारणाकडे अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व पत्रकारिता क्षेत्रासाठी मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक अभ्यासू ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले असून, त्यांनी निर्माण केलेली पोकळी भरून निघणे कठीण आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.


