(खेड)
खेड तालुक्यातील चिंचघर रेवेचीवाडी येथे अज्ञात चोरट्याने घराची खिडकी सरकवून आत प्रवेश करत घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत चोरट्याने कपाटातील लॉकर उघडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून एकूण ७६,००० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी गणेश सखाराम सुर्वे (वय ५०, व्यवसाय–ड्रायव्हर, रा. चिंचघर, रेवेचीवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना ०२ डिसेंबर २०२५ ते ०८ डिसेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्याने घराच्या पूर्व दिशेला असलेल्या बेडरूमच्या खिडकीची काच सरकवून घरात प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर चोरट्याने लोखंडी कपाटातील साड्यांच्या कप्प्यात ठेवलेली लॉकरची चावी शोधली, त्या चावीने लॉकर उघडून रोख ६,००० रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. खेड पोलीस या घटनेचा तपास सुरू असून परिसरातील हालचालींबाबत माहिती घेण्यात येत आहे.

