(खेड-रत्नागिरी/ प्रतिनिधी)
तालुक्यासह रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील विविध मंदिरांमधून पितळी घंटा चोरणाऱ्या सराईत भामट्याला खेड पोलिसांनी अटक केली आहे. राकेश तुळशीराम पडवकर (वय ३७, रा. लोणावळा-मावळ, जि. पुणे) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सुमारे ६ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दोन्ही जिल्ह्यांतील एकूण १६ चोरीच्या घटनांचा उलगडा झाला आहे.
३ ऑक्टोबर २०२५ रोजी खेड तालुक्यातील शिरगाव खुर्द-शिवाजीनगर येथील श्री काळकाई मंदिरातून पितळी घंटा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीडीजार चोरीस गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला. आरोपी रत्नागिरी व रायगड परिसरात वावरत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विशेष पथकाने सापळा रचला.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. रोहिदास केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू, वैभव ओहोळ, विजेंद्र सातार्डेकर, कृष्णा दराडे आणि शिरीष साळुंके यांचा पथकात समावेश होता.
पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर चौकशीत त्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दाभोळ, दापोली, मंडणगड, बाणकोट तसेच रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर परिसरातील मंदिरांतून घंटा व अन्य साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून पितळी धातूच्या घंटांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अटकेमुळे वर्षभरापासून सुरू असलेल्या मंदिरचोरीच्या मालिकेला अखेर पूर्णविराम मिळाल्याची प्रतिक्रिया स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.

