(चिपळूण/ प्रतिनिधी)
घरातील पत्र्याच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याची घटना कळकवणे-ऐनाडवाडी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादीने संशय व्यक्त केलेल्या राकेश प्रभाकर सुर्वे (रा. कळकवणे, ऐनाडवाडी, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १ लाख ८ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना ९ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून १० सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत कळकवणे, ऐनाडवाडी येथील दिपक रत्नाकर शिंदे (वय ६३) यांच्या राहत्या घरात घडल्याचे पोलिसांनी नोंदविले आहे. शिंदे यांनी याबाबत १० सप्टेंबर रोजी रात्री ९.३८ वाजता पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून संशयिताने घरात प्रवेश केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर घरातील पत्र्याच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये दोन तोळे वजनाचा सोन्याचा गळ्यातील हार, अंदाजे ६० हजार रुपये किमतीचा, तसेच दीड तोळे वजनाचे सोन्याचे कानातील फुल्ले व पट्टी, अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचे, आणि सुमारे एक ग्रॅम वजनाची सोन्याची नथणी, अंदाजे ३ हजार रुपये किमतीची, यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण १ लाख ८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या या प्रकाराचा पुढील तपास पोलिस करीत असून, फिर्यादीने संशय व्यक्त केलेल्या इसमाच्या भूमिकेबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.


