(खेड /प्रतिनिधी)
तालुक्यातील घाणेखुंट येथील धापसेवाडीमध्ये एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सुनिल बारक धापसे (वय ४०) हे त्यांच्या नव्याने बांधलेल्या घराच्या पडवीत मृतावस्थेत आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. धापसे यांनी घराच्या पडवीतील लोखंडी आळाला निळ्या रंगाच्या नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी (ता. खेड) येथे नेण्यात आला.
या घटनेप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास व आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

