(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत प्रवाशांची सतत वर्दळ असलेल्या कळंबणी परिसरातील एका ढाब्यावर पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेल्या स्टीलच्या ग्लासात डास आणि डासांच्या अळ्या आढळल्याचा दावा जागरूक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रवाशांना अन्न-पाण्याची सुविधा देण्याच्या नावाखाली स्वच्छतेचे नेमके किती ‘धडे’ गिरवले जातात, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, ज्या ग्लासातून ग्राहकांना पाणी दिले जाते, त्याच ग्लासात डासांच्या अळ्या आढळल्याचा प्रकार समोर आल्याने ढाब्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे असंख्य नागरिक कळंबणी परिसरातील ढाब्यांवर भोजन, नाश्ता आणि पिण्याच्या पाण्यासाठी थांबतात. प्रवाशांची ही गरज लक्षात घेऊन व्यवसाय करणाऱ्या ढाबा चालकांची स्वच्छता आणि अन्नसुरक्षेची जबाबदारीही तितकीच मोठी आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लासातच डास आणि अळ्या आढळल्याचा दावा खरा असेल, तर हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नव्हे, तर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा गंभीर प्रकार ठरू शकतो.
ढाब्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना भांडी स्वच्छ ठेवणे ही प्राथमिक जबाबदारी मानली जाते. मात्र, पाण्यासाठी ठेवलेल्या ग्लासातच डासांच्या अळ्या आढळणे म्हणजे स्वच्छतेच्या नावाखाली नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित करणारे चित्र आहे. ग्राहकांच्या ताटात चविष्ट पदार्थ वाढण्यापूर्वी त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळते की नाही, याकडेही ढाबा चालकांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जागरूक नागरिकांनी हा प्रकार संबंधित ढाबा चालकाच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगण्यात आले. तसेच आरोग्य सेवक सचिन जाधव आणि अथांग पवार यांनाही याबाबत माहिती देण्यात आली.
डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर प्रकार अधिक गंभीर
पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असताना सार्वजनिक ठिकाणी पाण्याची साठवणूक आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणे धोकादायक ठरू शकते. डेंग्यू आणि अन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी साचलेले पाणी, अस्वच्छ भांडी आणि डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेल्या ग्लासातच डासांच्या अळ्या आढळल्याचा दावा चिंतेची बाब आहे. त्यामुळे संबंधित ढाब्यासह महामार्गालगत असणाऱ्या ढाब्याची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
आरोग्य विभाग ‘ग्लास’ उचलणार का?
या प्रकाराची आरोग्य विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी होणार का, पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार का आणि ढाब्यावरील स्वच्छतेची स्थिती काय आहे, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची तपासणी केली जाणार का, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी होत आहे. महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याने ‘ग्राहक येतात, पैसे देतात आणि निघून जातात’ या मानसिकतेला लगाम घालण्याची वेळ आली आहे. ढाब्यावर स्वच्छता हा दिखाव्याचा विषय नसून ग्राहकांच्या आरोग्याशी थेट जोडलेली जबाबदारी आहे. त्यामुळे ग्लासात डासांच्या अळ्या आढळल्याचा दावा केवळ चर्चेपुरता न राहता त्याची सत्यता प्रशासनाने तपासावी आणि दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

