(गुहागर /रत्नागिरी)
शृंगारतळी पोलिस चौकीच्या मागील बाजूस असलेल्या दुकानाच्या गाळ्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या दबा धरून उभ्या असलेल्या व्यक्तीवर गुहागर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित व्यक्तीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम १२२ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी रात्री १२.४० वाजण्याच्या सुमारास शृंगारतळी पोलिस चौकीच्या मागील बाजूस दुकानाच्या गाळ्यालगत अंधारात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सूर्यास्तापासून सूर्योदयापूर्वीच्या कालावधीत अंधाराचा फायदा घेत स्वतःचे अस्तित्व लपवून संबंधित व्यक्ती उभी असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तेथे कोणत्या कारणासाठी उपस्थित असल्याबाबत विचारणा केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संशयास्पद परिस्थितीत आढळून आलेल्या या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल भावेश भगवान रोहीलकर (३५, नेमणूक गुहागर पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव हरिन्द्र रमेश राजभर (३१) असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो जानवळे मोहल्ला, ता. गुहागर येथे राहत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम १२२ (क) अन्वये गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


