(पोलादपूर / शैलेश पालकर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटाला पर्याय ठरलेल्या दुहेरी भुयारी मार्गातील पाण्याची गळती अद्याप पूर्णपणे थांबलेली नाही. भुयाराच्या छताकडील कातळातून येणारे पाणी काही ठिकाणी रस्त्यावर तसेच वाहनांवर पडत असल्याने पावसाळ्यात रस्ता निसरडा होऊन अपघाताचा धोका निर्माण होत आहे. विशेषतः आगामी गणेशोत्सवात मुंबई, पुणे आणि अन्य भागांतून मोठ्या संख्येने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
कशेडी घाटातील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी दुहेरी भुयारी मार्ग व जोडरस्त्यांचा प्रकल्प हाती घेण्यात आला. सुमारे ५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात दोन स्वतंत्र भुयारी मार्ग असून, प्रत्येक भुयाराची लांबी सुमारे दोन किलोमीटर आहे. जोडरस्त्यांसह संपूर्ण प्रकल्पाची लांबी सुमारे नऊ किलोमीटर आहे. भुयारी मार्गाचे काम २०१९ मध्ये सुरू करण्यात आले आणि २०२१ मध्ये ते पूर्ण झाले.
भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर काही अंतरावर छताकडील कातळातून भूगर्भातील पाणी झिरपून रस्त्यावर येत असल्याचे निदर्शनास आले. पावसाळ्यात या गळतीचे प्रमाण वाढत असल्याने भुयाराच्या छतासह भिंतींवरून पाण्याचे प्रवाह दिसून येतात. परिणामी रस्त्यावर पाणी साचून तो निसरडा होण्याची शक्यता वाढते. दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही अशा ठिकाणी विशेष काळजी घ्यावी लागत आहे.
गळतीच्या समस्येवर उपाय करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार विविध उपाययोजना करण्यात आल्या. छत आणि कातळातून येणारे पाणी थेट रस्त्यावर पडू नये यासाठी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली. शॉटक्रिट, पीव्हीसी मेम्ब्रेन आणि फायबर शीटचे अस्तर यांसारख्या तांत्रिक उपायांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भुयारातील गळणारे पाणी बाजूच्या गटारांमध्ये वळवून ड्रेनेज व्यवस्थेद्वारे बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र, या उपाययोजनांनंतरही काही ठिकाणी पाण्याची गळती सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गळती पूर्णपणे थांबविण्याच्या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः मुसळधार पावसाच्या काळात रस्त्यावर पाणी आल्यास वाहनांचे टायर घसरण्याचा धोका वाढू शकतो. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
या गळतीची दुरुस्ती आणि देखभाल प्रकल्पाच्या दोष दायित्व कालावधीतील कामाचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गळती रोखण्यासाठी कंत्राटदार कंपनीकडूनच आवश्यक दुरुस्ती व देखभाल केली जाणे अपेक्षित आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून स्वतंत्र अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
भुयारी मार्गात वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक व्हेंटिलेशन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निरोधक यंत्रणा, हायटेक एलईडी पथदीप, आपत्कालीन वीजपुरवठा आणि जनरेटर बॅकअपची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही भुयारी मार्गांना जोडणारे आपत्कालीन मार्गही उपलब्ध आहेत. मात्र, या सर्व सुविधांसोबत पाण्याची गळती पूर्णपणे थांबणे आणि रस्ता सुरक्षित राहणे अत्यावश्यक आहे.
दरम्यान, भुयारी मार्गाच्या जोडरस्त्यांवरही पावसाळ्यात बाजूच्या डोंगरातून लाल मातीचे ढिगारे तसेच दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होत असल्याचे स्थानिक पातळीवर निदर्शनास येत आहे. त्यामुळे भुयारी मार्गाबरोबरच जोडरस्त्यांच्या सुरक्षिततेकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान, एसडीपीएलचे अमोल शिवतारे यांनी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा भुयारी मार्गातील पाण्याच्या गळतीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा केला आहे. लवकरच दोन्ही भुयारी मार्ग गळतीमुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी आणि अमोल माडकर यांनीही शिवतारे यांच्या माहितीस दुजोरा दिला आहे.
त्यामुळे प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराकडून गळतीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी गणेशोत्सवापूर्वी प्रत्यक्षात भुयारी मार्गातील पाण्याची समस्या कितपत नियंत्रणात येते, याकडे वाहनचालक आणि कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी वाहतूक लक्षात घेता भुयारी मार्गातील रस्ता सुरक्षित, कोरडा आणि घसरणीपासून मुक्त ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना होणे गरजेचे आहे.

