(चिपळूण)
प्रेमसंबंधाच्या संशयातून पती आणि सासू करत असलेल्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खांदाट, मोरवणे फाटा येथे घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी पती आणि सासूवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मृत विवाहितेचे वडील विनायक जयसिंग राठोड (वय ५५, रा. जानवळ, ता. चाकूर, जि. लातूर) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुलगी शकुंतला अशोक चव्हाण हिने पती अशोक मोतीराम चव्हाण आणि सासू कमलाबाई मोतीराम चव्हाण (दोघे रा. मोरवणे, खांदाटपाली) यांच्या त्रासाला कंटाळून २५ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली.
शकुंतला हिचा पती अशोक चव्हाण याचा आपल्या कामाच्या ठिकाणी असलेल्या सुप्रिया नामक महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. फिर्यादीनुसार, अशोक चव्हाण हा शकुंतलाला शिवीगाळ करत असे, तसेच हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाणही करायचा.
या व्यतिरिक्त, सासू कमलाबाई चव्हाण हिनेही शकुंतलावर सातत्याने तुच्छ वागणूक दिली. “माझ्या घरातून निघून जा, मला तुझी गरज नाही” असे बोलून ती तिला घराबाहेर जाण्यास भाग पाडायची. या सततच्या मानसिक छळामुळे त्रस्त होऊन शकुंतलाने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. या घटनेनंतर चिपळूण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण, तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिपळूण पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.