(जयसिंगपूर / वृत्तसंस्था)
महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकाचे लक्ष लागून राहिलेल्या नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ हत्तिणी तब्बल ४०९ दिवसांनी पुन्हा नांदणीत परतली आहे. आपल्या हक्काच्या घरात ‘माधुरी’चे पुनरागमन होताच नांदणीसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो सर्वधर्मीय नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. शुक्रवारी ‘वनतारा’च्या ४० कर्मचाऱ्यांचे पथकही नांदणीत दाखल झाले आहे. ‘माधुरी’च्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २५ हून अधिक पोलिस अधिकारी, १०० हून अधिक पोलिस कर्मचारी आणि ५० पेक्षा जास्त होमगार्ड तैनात करण्यात आले होते.
गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ हत्ती पुनर्वसन केंद्रातून गुरुवारी सायंकाळी ५.१५ वाजता विशेष ॲनिमल ॲम्बुलन्समधून ‘माधुरी’ला नांदणीच्या दिशेने रवाना करण्यात आले. ‘वनतारा’ची टीम आणि वैद्यकीय ताफ्यासह बडोदा, सुरत, वापी, नवसारी, वसई, विरार, ठाणे, पुणे, सातारा आणि कराड असा १,१६० किलोमीटरचा प्रवास तिने ३२ तासांत पूर्ण केला. शुक्रवारी रात्री ‘माधुरी’ नांदणी मठात सुरक्षितरीत्या दाखल झाली.
तिच्या आगमनाची चाहूल लागताच नांदणीच्या गांधी चौकात हजारो नागरिक स्वागतासाठी एकत्र आले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांचे तेथे आगमन होताच त्यांच्यावर गुलाबांची उधळण करण्यात आली. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, दत्त समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी ‘माधुरी’च्या वाहनाचे स्वागत केले. जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा भव्य वर्षाव करण्यात आला. नागरिकांनी साखर-पेढ्यांचे वाटप केले, तर प्रमुख मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
या स्वागत सोहळ्यासाठी नांदणीपुरते नागरिक मर्यादित राहिले नाहीत. कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यांतील सर्वधर्मीय नागरिकांसह महिला, वृद्ध आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. ४०९ दिवसांनंतर आपल्या लाडक्या हत्तिणीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ‘माधुरी’च्या घरवापसीचा क्षण कॅमेऱ्यात आणि मोबाईलमध्ये टिपण्यासाठी उपस्थितांमध्ये चढाओढ दिसून आली.
निशिधिका परिसरात वाहन पोहोचल्यानंतर ‘वनतारा’ टीम, वन विभाग आणि आरोग्य पथकाच्या मदतीने ‘माधुरी’ला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यानंतर मंगलमय आणि भावुक वातावरणात तिने नवनिर्मित निवासस्थानात प्रवेश केला. नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी आणि कोल्हापूर मठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी धार्मिक विधीनुसार तिचे स्वागत केले.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ‘माधुरी’ला ‘वनतारा’ येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. नांदणी मठाला मिळालेले सर्वधर्मीयांचे पाठबळ, राजू शेट्टी यांचे मोठे आंदोलन तसेच राज्यासह देशभरातून उमटलेला उद्रेक आणि अखेर झालेली ‘माधुरी’ची घरवापसी हे कोल्हापूरकरांनी करून दाखवले आहे.
जामनगर येथील ‘वनतारा’च्या पुनर्वसन केंद्रात एकूण ३७६ हत्ती आहेत. तेथे ‘माधुरी’ची दोन माहूत देखभाल करत होते. तिच्या दिनक्रमाची सुरुवात सकाळी चारा देण्यापासून होत असे. त्यानंतर फेरफटका, सकाळच्या सत्रातील खाद्य आणि फळे दिली जात. दुपारी स्वच्छता करून तिला स्विमिंग टॅंकमध्ये सोडले जात असे. त्यानंतर ओला व सुका चारा तसेच पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली जात होती. सायंकाळचे खाद्य झाल्यानंतर फेरफटका आणि रात्री फळे व चारा दिला जात असे. सकाळच्या सत्रात वैद्यकीय पथकाकडून तिची पाहणी केली जात होती.
हाय-पॉवर्ड कमिटीच्या मंजुरीनंतर ‘माधुरी’ला कोल्हापूरच्या नांदणी मठात परतण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार तिला नांदणीत आणण्यात आले आहे. आता तिच्याकडून कोणतेही काम करून घेतले जाणार नाही. तिची २४ तास देखभाल करणे आणि दर १५ दिवसांनी आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे. आरोग्य तपासणी तसेच उपचारांसाठी ‘वनतारा’चा पशुवैद्यक विभाग सहकार्य करणार आहे.


