(मुंबई / वृत्तसंस्था)
गणेश चतुर्थीला अवघे दोन दिवस उरले असताना मुंबईतील गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांचे विशेष आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन शुक्रवारी (11 सप्टेंबर) संध्याकाळी 7 वाजता अधिकृतपणे घडवण्यात आले. लालबागच्या राजाच्या मनमोहक आणि तेजस्वी रूपाचे भक्तीमय वातावरणात अनावरण होताच उपस्थित भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे पारंपरिक, भव्य आणि राजाच्या थाटातील रूप यंदाही भक्तांना मंत्रमुग्ध करणारे आहे. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ तसेच ‘लालबागच्या राजाचा विजय असो’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा 93 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 2026 मधील गणेशोत्सवासाठी मंडळाने भव्य मंदिर स्वरूपाची थीम साकारली आहे. यामुळे यंदाच्या दरबारात धार्मिक आणि कलात्मक वैभवाचा अनोखा संगम भाविकांना अनुभवता येणार आहे.
यंदाच्या सजावटीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण दरबार चांदीच्या नक्षीकामाने सजवण्यात आला आहे. या भव्य सजावटीमुळे लालबागच्या राजाच्या दरबाराला राजेशाही रूप प्राप्त झाले आहे. दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध मिनाक्षी मंदिराची प्रतिकृती मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आली आहे.
तसेच सजावटीमध्ये भगवान शिवशंकराच्या महाकाल आणि रामेश्वरम मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ महाकाय त्रिशूळ उभारण्यात आला असून मंडळाच्या प्रवेशद्वारासह अंतर्गत सजावटीतील पौराणिक भव्य मंदिरांचे खांब, कोरीव काम आणि शिवशंभूंचे प्रतीक असलेला मोठा त्रिशूळ भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. यंदाच्या लालबागच्या राजाच्या दरबारातून भक्तांना धार्मिक श्रद्धेसोबत कलात्मक वैभवाचाही अनुभव मिळणार आहे.
आता गणेशभक्तांना 14 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची आणि आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाची प्रतीक्षा आहे. लालबागच्या राजाच्या 2026 मधील पहिल्या लूकमध्ये बाप्पाचं भव्य आणि आकर्षक रूप पाहायला मिळत आहे. प्रथम दर्शनाची ही झलक समोर येताच सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बाप्पाच्या पहिल्या दर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.


