(मुंबई)
आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र असून, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते अनिवार्य आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) हे कार्ड जारी करते आणि त्याच संस्थेकडून विविध अपडेटची प्रक्रिया केली जाते. आता आज (१ ऑक्टोबर) पासून आधार अपडेटसाठी नवीन शुल्क आकारणी लागू झाली आहे.
आधार कार्ड बनवणे अजूनही मोफत
UIDAI च्या नियमानुसार नवीन आधार कार्ड बनवणे हे सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. नागरिक आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन सहजपणे आधार नोंदणी करून घेऊ शकतात.
बायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क
UIDAI ने जारी केलेल्या नव्या दरानुसार, फिंगरप्रिंट, डोळ्यांची आयरीस किंवा फोटो बदलणे यांसारख्या बायोमेट्रिक अपडेटसाठी आता १२५ रुपये शुल्क भरावे लागेल.
- ७ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटसाठीदेखील १२५ रुपये आकारले जातील.
- याआधी, म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत हे अपडेट पूर्णपणे मोफत होते.
नाव, पत्ता बदलण्यासाठी किती पैसे लागतील?
- नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी बदलणे अशा डेमोग्राफिक अपडेटसाठी आता ७५ रुपये शुल्क आकारले जाईल.
- मात्र हे अपडेट जर बायोमेट्रिक अपडेटसोबत केले, तर ते मोफत असेल.
- ऑनलाईन पद्धतीने अपडेट केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटमध्ये सवलत
५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे पहिल्यांदा केलेले बायोमेट्रिक अपडेट मोफत असेल. तथापि, दुसऱ्या वेळेस किंवा नंतर पुन्हा अपडेट करावे लागल्यास नागरिकांना १२५ रुपये मोजावे लागतील.
जुने आधार अपडेट करणे अनिवार्य
UIDAI ने स्पष्ट केले आहे की, १० वर्षांपेक्षा जुने आधार कार्ड अपडेट करणे आता बंधनकारक आहे. त्यामुळे, ज्यांनी गेल्या दशकभरात आपले आधार अपडेट केलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

