(मुंबई)
अभिनेते पंकज धीर यांच्या निधनानंतर आता दिग्गज अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना मधुमती यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. ८७ वर्षांच्या मधुमती यांनी बुधवार (१५ ऑक्टोबर) सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीने एक उत्तम अभिनेत्री आणि अप्रतिम नर्तकी गमावली आहे. अभिनेता विंदू दारा सिंह यांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली असून, अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मधुमती या केवळ एक गुणी अभिनेत्री नव्हत्या, तर त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्यांना नवी ओळख दिली होती. भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि कथकली या नृत्यप्रकारात त्या पारंगत होत्या. लहानपणापासूनच नृत्याची ओढ असलेल्या मधुमती यांनी १९५७ साली एका मराठी चित्रपटात नर्तकी म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती, मात्र तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तरीदेखील त्यांच्या मेहनतीने आणि कलेवरील प्रेमाने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं नाव मिळवून दिलं.
त्यांनी ‘आंखे’, ‘टॉवर हाऊस’, ‘शिकारी’ आणि ‘मुझे जीने दो’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांच्या सहज अभिनयाने आणि आकर्षक नृत्यशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक गाण्यांमध्ये मधुमती यांचा नृत्याविष्कार आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.
व्यक्तिगत आयुष्यातही मधुमती या चर्चेत राहिल्या. वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी आपल्यापेक्षा वयाने मोठे आणि चार मुलांचे वडील असलेल्या प्रसिद्ध नर्तक मनोहर दीपक यांच्याशी विवाह केला होता. दीपक यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी मधुमतींसोबत लग्न केलं. या विवाहाला त्यांच्या आईचा विरोध होता, पण प्रेम आणि नृत्यावरील ओढ यांनी दोघांना एकत्र आणलं.
मधुमती यांच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांमुळे आणि नृत्यशैलीमुळे त्यांची तुलना अनेकदा हेलन यांच्याशी केली जात असे. पण मधुमती यांनी आपल्या स्वतंत्र ओळखीवर ठाम राहून स्वतःचा ठसा उमटवला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या नृत्याशी जोडलेल्या राहिल्या आणि विद्यार्थ्यांना नृत्य शिकवत राहिल्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत आणि नृत्यविश्वात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कलाकृती आणि योगदानामुळे त्यांचं नाव कायम स्मरणात राहील.

