(नवी मुंबई / वृत्तसंस्था)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध भरती परीक्षांमधील पेपरफुटीच्या संशयावरून राज्यात वातावरण तापले असतानाच नवी मुंबईत एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे काळे फासले. औषध निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकार आणि फुटलेल्या पेपरच्या मुद्द्यावरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा करत संघटनेने ही आक्रमक भूमिका घेतली.
प्रशासनाकडून या प्रकरणात ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी थेट एमपीएससी सचिव महेंद्र हरपाळकर यांना गाठत त्यांच्या चेहऱ्यावर काळे फासले.
या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. “एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या आणि महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने संभाजी ब्रिगेडने या भ्रष्ट व्यवस्थेच्या तोंडाला काळं फासलं आहे. महेंद्र हरपाळकर यांच्या थोबाडीत मारून सरकारने झोपमोड करावी यासाठी ही थप्पड मारण्यात आली आहे,” असे शिंदे म्हणाले.
संघटनेने एमपीएससीच्या अध्यक्षांनाही इशारा दिला आहे. “आज झालेली कारवाई ही केवळ एक झलक आहे, अध्यक्ष अजून बाकी आहेत. अध्यक्ष आणि सचिवांनी तातडीने पदावरून पायउतार व्हावे, अन्यथा पुढचा नंबर आयोगाच्या अध्यक्षांचा असेल यात तिळमात्र शंका नाही,” असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला.
यापूर्वी 3 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करून शासनाला चेतावणी देण्यात आली होती, असा दावा संभाजी ब्रिगेडने केला. मात्र सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याने त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागले, असेही संघटनेने म्हटले आहे.
दरम्यान, एमपीएससी सचिवांच्या तोंडाला काळे फासल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला. शाईफेक किंवा काळे फासणे हे कृत्य दुर्दैवी असून सुसंस्कृतपणाला तसेच लोकशाही व्यवस्थेला धरून नसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी आमच्या कार्यकर्त्यावर शाईफेक झाली होती, तेव्हाही आम्ही त्याचा स्पष्ट निषेध केला होता, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
संविधानाच्या चौकटीत राहून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली. आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांच्या बाजूने मैदानात उतरले असून या प्रकरणात राजकारण करण्याचा हेतू नसून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेनंतर काही आक्षेप असतील तर पुन्हा संवादाच्या माध्यमातून मार्ग काढला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली. “एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांनी पेपरफुटी, भ्रष्टाचार या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निश्चितच खेळ केला आणि याबाबत विद्यार्थ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, हे नक्कीच खरंय.. पण त्याचा विरोध आपण संविधानिक मार्गाने करत आहोत आणि करत राहू… महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात तेवढी ताकद आहे, त्यामुळं आपण नक्कीच यशस्वी होऊ.. संविधानिक मार्ग हाच राजमार्ग… कुणाच्या अंगावर शाई टाकण्याला आमचं कदापि समर्थन नाही,” असे रोहित पवार यांनी म्हटले.
महेंद्र हरपाळकर हे वर्ष 1995 पासून विविध प्रशासकीय पदांवर कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी आहेत. अन्न व औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी संदर्भात तक्रार आल्यानंतर एका तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी एमपीएससीच्या सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवरही जबाबदारी सांभाळली आहे.


