(राजापूर / तुषार पाचलकर)
ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी वैद्यकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी नोंदविण्यात आली. एकाच दिवशी तीन सिझेरियन सेक्शन प्रसूती, गर्भपिशवी साफ करण्याची एक शस्त्रक्रिया तसेच २० गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी करण्यात आल्या. ग्रामीण रुग्णालय राजापूरच्या इतिहासात एकाच दिवशी तीन सिझेरियन सेक्शन प्रसूती होण्याची ही प्रथमच घटना ठरली आहे.
या सर्व शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय प्रक्रियांसाठी ग्रामीण रुग्णालय राजापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी सोनोलॉजिस्ट तसेच सर्जन म्हणून काम पाहिले. भूलतज्ज्ञ म्हणून रत्नागिरी येथील डॉ. दत्तप्रसाद केतकर यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच बालरोग तज्ज्ञ म्हणून डॉ. उमेश चव्हाण यांनी कामकाज पाहिले.
या यशस्वी वैद्यकीय सेवेसाठी ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण टीमने महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉ. आर्यन, डॉ. हर्षानी, डॉ. स्नेहल, डॉ. प्रसन्ना तसेच स्टाफ नर्स बोरकर, लांजेकर, राठोड, महाडीक, चव्हाण, ब्रदर नाटेकर, शिपाई प्रशांत, निशांत, चव्हाण आणि नाखरेकर माई यांनी डॉ. राम मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली. त्यांच्या समन्वयातून या सर्व शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय सेवा यशस्वीपणे पार पडल्या.


