(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील साखरी नाटे ग्रामपंचायत हद्दीतील घेरा यशवंतगडच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामाला आठ कोटी 19 लाख रुपयाचा निधी मंजूर असून लातूर येथील ठेकेदार कंपनीकडून हे काम सुरू आहे. दीड वर्षापासून किल्ला डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र या कामाबद्दल स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शिवप्रेमी ना कधीही विश्वासात घेतले गेलेले नाही. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे स्थानिक सरपंच संदीप बांदकर आणि काही शिवप्रेमींनी वारंवार निदर्शनास आणून दिले आहे.
या कामासाठी सुमारे साडेतीनशे फूट खोल बोअरवेल काढून पाण्याचा वापर होत होता. मात्र हे पाणी खारट असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते. बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगडही निकृष्ट दर्जाचा वापरण्यात येत आहे. वाळू देखील खाडीची वापरण्यात येत होती. या सर्वांचा परिणाम म्हणून सुरू असलेले हे बांधकाम पावसाच्या पहिल्याच सरीमुळे ढासळले आहे.
हे बांधकाम आठ दिवसांपूर्वी ढासळल्यानंतर पुनर्बांधणीसाठी कोणतीही पावले ठेकेदाराकडून उचलली गेली नाहीत. त्यामुळे नाटे परिसरातील ग्रामस्थ आणि शिवप्रेमी संतप्त झाले असून शासनाने पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
शिवसेना राजापूर तालुकाध्यक्ष दीपक नागले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली असून अधिकारी आणि ठेकेदाराच्या मनमानी आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासन आणि लोकप्रतिनिधींची बदनामी होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. ग्रामस्थ शिवप्रेमी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराची एकत्रित बैठक आमदार साहेबांच्या उपस्थितीत घेतली जाऊन याचा जाब विचारला जाईल असे म्हटले आहे.
पुरातत्व विभागाने आणि ठेकेदाराने या कामाला सुरुवात करताना संबंधित व लगत गावच्या ग्रामस्थ शिवप्रेमी किंवा ग्रामपंचायतीशी कोणती बैठक व चर्चा केली नसल्याचे सांगितले जात आहे. शिव संघर्ष संघटना नाटेचे अध्यक्ष मनोज आडविलकर यांनी देखील तीव्र संताप व्यक्त करताना ठेकेदाराच्या मनमानी आणि निकृष्ट कामामुळे हे बांधकाम ढासळले असून पुरातत्व विभाग आणि ठेकेदाराकडे वारंवार कामा संदर्भात माहिती विचारून सुद्धा कधीही माहिती दिली गेली नाही मात्र बांधकाम पडल्यानंतर काल या कामाचे इस्टिमेट व्हाट्सअप वरून पाठवण्यात आले. हे काम करत असताना ऐतिहासिक संदर्भ सुद्धा मिटविले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
शिव संघर्ष संघटना आणि शिवप्रेमी कडून गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्याचे संवर्धन व्हावे यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली आहे. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला गेला आहे. आता निधी मंजूर झाल्यानंतर पुरातत्व विभाग आणि ठेकेदार स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि शिवप्रेमी यांना डावलून आपल्या मनमानी प्रमाणे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

