(रत्नागिरी)
राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनमध्ये (वाडा) यंदापासून प्रथमच भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होणार आहे. येत्या शुक्रवारी दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता भाजपाचे राष्ट्रीय महासचिव व राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे.
तावडे वाड्याचा अलिकडेच सातवा वर्धापनदिन साजरा झाला. रत्नागिरीमार्गे सिंधुदुर्ग, गोव्यात जाणाऱ्या सागरी मार्गावर आडिवरे येथे ऐतिहासिक तावडे वाडा हा रत्नागिरीची शान आहे. तावडे अतिथी भवनाचे शिल्पकार संतोष तावडे यांच्या संकल्पनेतून पहिल्या टप्प्यात तावडे भवनाची इमारत उभी राहिली व आता कुलदैवत श्री सप्तकोटेश्वर मंदिर उभारण्यात येत आहे. या वास्तूचे पावित्र्य जपण्याचे काम तावडे हितवर्धक मंडळ करत असून येथे येणारे पर्यटकही नेहमीच पावित्र्य जपून वावर करतात. त्यामुळे ही नेहमीच वास्तू नीटनेटकी, स्वच्छ व आकर्षक अशी दिसते.
तावडे हितवर्धक मंडळाची सुरवातही साधारण ८० वर्षांपूर्वी मुंबई येथे झाली. तेव्हापासून मंडळ देशभरात कार्यरत आहे. आता तावडे अतिथी भवनात भारतीय स्वातंत्र्यदिन यंदापासून चालू करणार आहे. या सोहळ्यासाठी क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे, आर्किटेक्ट संतोष तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे व राजेंद्र तावडे, सरचिटणीस सतीश तावडे, खजिनदार प्रदीप तावडे, सचिव चंद्रकांत तावडे, गोविंद तावडे, सुबोध तावडे, सुधीर तावडे, सहाय्यक खजिनदार स्नेहा तावडे व तावडे कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. आडिवरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तावडे यांची गावे असलेल्या वाडा, विलये, वालये येथील तावडे बंधू-भगिनींनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तावडे हितवर्धक मंडळाने केले आहे.