(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी रत्नागिरी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी ८ व ९ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करून बंदोबस्त आणि महामार्ग व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी महत्त्वाच्या वाहतूक ठिकाणांसह गणेश विसर्जनस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यंदा रत्नागिरी जिल्ह्यात १२७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि तब्बल १ लाख ६९ हजार ५३८ खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. समुद्रकिनारे, खाड्या, नद्या आणि तलाव अशा विविध ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने या सर्व विसर्जनस्थळांवर आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ५८ पोलीस अधिकारी आणि ६५० पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि आवश्यक साधनसामग्रीने सज्ज आरसीपीची दोन आणि क्यूआरटीची दोन पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. एसआरपीएफची एक कंपनीही तैनात करण्यात येणार असून, अतिरिक्त ५०० होमगार्ड, २० पोलीस अधिकारी आणि १०० पोलीस अंमलदारांची मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमानी आणि भाविकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरील १४ महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉइंट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी तैनात करण्यात येणाऱ्या मनुष्यबळाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियमन, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीचा प्रतिसाद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक मीणा यांनी या सर्व महत्त्वाच्या बंदोबस्त पॉइंटची प्रत्यक्ष पाहणी केली. वाहतूक नियोजन, उपलब्ध मनुष्यबळ, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था तसेच संभाव्य वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचा त्यांनी आढावा घेतला. अरुंद पूल, बॉटलनेक आणि अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
गणेशोत्सवाच्या कालावधीत महामार्गावरील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ५९ रुग्णवाहिका आणि ३३ क्रेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघात किंवा वाहतूक कोंडीच्या प्रसंगी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याबरोबरच बंद पडलेली किंवा अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक पूर्ववत करण्यास मदत होणार आहे. महामार्ग व्यवस्थेच्या आढाव्यात खेड येथील जगबुडी पूल, चिपळूणचा वाशिष्ठी नदी पूल, संगमेश्वरचा शास्त्री पूल, लांजा-अंजनारी पूल आणि वेरळ घाट यांसह संभाव्य वाहतूक कोंडीची ठिकाणे, अरुंद पूल, बॉटलनेक आणि ब्लॅक स्पॉट यांचा विशेष आढावा घेण्यात आला.
गणेश विसर्जनाच्या काळात गर्दी वाढणाऱ्या ठिकाणी स्वतंत्र पोलीस पथके नियुक्त केली जाणार असून, वाहतूक नियंत्रण, विसर्जनस्थळांची सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. या पाहणीदरम्यान पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, पोलीस उपअधीक्षक आरांकशा यादव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.


