(मुंबई / वृत्तसंस्था)
अलाहाबाद उच्च न्यायालयातून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी वर्णी लागलेले न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी बुधवारी पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे ५० वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली.
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लोकभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह काही कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठातील सर्व न्यायमूर्तींनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली.
सेवाज्येष्ठतेनुसार अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीशपदावर कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांच्या नावाची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्याच महिन्यात शिफारस केली होती. शपथविधीनंतर मुख्य न्यायमूर्तीपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. न्याय, निष्पक्षता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करत न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी 1990 मध्ये लखनऊ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर 11 जानेवारी 1992 रोजी त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली. आपल्या वकिलीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रामुख्याने दिवाणी प्रकरणे हाताळली. ऑक्टोबर 2007 पासून त्यांनी उत्तर प्रदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य वकील म्हणून काम पाहिले.
यानंतर 27 सप्टेंबर 2013 रोजी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. 10 एप्रिल 2015 रोजी त्यांना कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून शपथ देण्यात आली. त्यांच्या सेवाकाळातील अद्याप दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असून, ते 20 जून 2028 रोजी निवृत्त होणार आहेत.


