(मुंबई / वृत्तसंस्था)
सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेपेक्षा कामगिरीच्या आधारे संधी देण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन केले जाणार असून, मागील तीन वर्षांतील कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप आणि पुढील तीन वर्षांच्या कामकाजाचे नियोजन करण्याबरोबरच भविष्यातील नियुक्त्यांच्या वेळीही केला जाणार आहे.
या निर्णयामुळे प्रत्यक्ष कामगिरी, नेतृत्वक्षमता, रुग्णसेवा, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्व मिळणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार जबाबदारी देण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासही मदत होणार आहे.
31 मार्च 2026 रोजी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची माहिती अद्ययावत करून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. सन 2023-24, 2024-25 आणि 2025-26 या तीन वर्षांतील पदावरील कामकाजाचा आधार घेत एकूण 100 गुणांचे मूल्यांकन होईल. या गुणांनुसार अधिकाऱ्यांचे अ, ब, क आणि ड अशा चार श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे. हे गुणांकन दरवर्षी केले जाणार असून, पुढील तीन वर्षांतील कामाचे नियोजन करतानाही त्याचा विचार केला जाणार आहे.
अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करताना लोकाभिमुखता आणि तक्रार निवारण, नेतृत्वगुण, विशेष कौशल्य, प्रशिक्षण आणि संवादकौशल्य यांचा विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक नियोजन, राज्य लेखाशीर्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि CSR निधीचा प्रभावी वापर करण्यासाठी केलेले आर्थिक व्यवस्थापनही तपासले जाणार आहे.
आरोग्य संस्थांमधील आहार आणि औषधांचा पुरवठा, स्वच्छता, कंत्राटी मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर तसेच आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेली कार्यवाही हेही मूल्यांकनाचे निकष असतील. अधिनस्त रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील मनुष्यबळ व्यवस्थापनाबरोबरच नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार आणि अपघातांच्या काळातील अधिकाऱ्यांची कामगिरीही विचारात घेतली जाणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यक्रमांची अंमलबजावणी, शासनाच्या विशेष अभियानांची प्रभावी अंमलबजावणी तसेच ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’, अरुणोदय-सिकलसेलमुक्त महाराष्ट्र, पॅलेटिव्ह केअर अभियान आणि कर्करोगमुक्त महाराष्ट्र यांसारख्या उपक्रमांमधील योगदानालाही गुण दिले जाणार आहेत. यासोबतच आयुष्मान भारत कार्ड, आरोग्य विभागाच्या विविध पोर्टलवरील माहिती अद्ययावत करणे, महाकर्मी पोर्टलवरील कामकाज आणि एकत्रित आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी या डिजिटल व योजनाधारित कामगिरीचाही मूल्यांकनात समावेश असेल.
नामनिर्देशनासाठीही स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील आणि किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. त्यांच्याविरोधात कोणतीही शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी, अपहाराच्या प्रकरणात सहभाग नसावा आणि गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नसाव्यात. उत्कृष्ट चारित्र्य आणि निर्विवाद सचोटी हा देखील नामनिर्देशनाचा महत्त्वाचा निकष ठेवण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय यंत्रणेचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेवर होतो. त्यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाची योग्य दखल घेऊन त्यांना त्यानुसार पुढील संधी देणे हा या निर्णयाचा केंद्रबिंदू आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन आरोग्य संस्थांचा दर्जा, रुग्णसेवा, योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यक्षमता सुधारण्यास चालना मिळणार आहे. नियुक्त्या आणि जबाबदाऱ्यांच्या वाटपात गुणवत्ता व पारदर्शकतेला अधिक महत्त्व मिळणार आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व केंद्रस्थानी ठेवून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. या प्रक्रियेला प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या प्रशासकीय अनुभवाची साथ मिळणार आहे. तीन वर्षांची कामगिरी, 100 गुणांचे मूल्यांकन आणि स्पष्ट श्रेणीकरणामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करता येणार आहे.
‘कामगिरीला मान्यता आणि गुणवत्तेला संधी’ या सूत्रावर आधारित ही व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पारंपरिक कार्यपद्धतीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आकाराला येणारी ही कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती आरोग्य विभागासाठी आदर्श व नाविन्यपूर्ण ठरणार असून लोकाभिमुख आरोग्यसेवा प्रत्यक्ष साकारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


