(नागपूर)
कोकणवासीयांच्या दशकांपासूनच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा ऐतिहासिक निर्णय अखेर घेण्यात आला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य सरकारमार्फत उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी 11 डिसेंबर रोजी विधानसभेत दिली. या प्रकल्पासाठी खासदार नारायण राणे यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कोकणासाठी ‘गेमचेंजर’ निर्णय – नितेश राणे
नागपूर विधानभवनात माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले :
- वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासन उभारणार आहे, असा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
- हा फक्त कोकणासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरेल.
- या मार्गामुळे कृषी, मत्स्य आणि पर्यटन उद्योगांना मोठी गती मिळेल.
- पूर, भूस्खलन अशा आपत्तीच्या काळात हा मार्ग पर्यायी दळणवळण सुविधा म्हणून उपयुक्त ठरेल.
- भूसंपादन प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली.
कोकणातील रोजगार आणि उद्योगांना नवी दिशा
नितेश राणे पुढे म्हणाले की —
- या निर्णयामुळे कोकण आणि महाराष्ट्राचा आर्थिक वेग झपाट्याने वाढेल.
- सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.
- आजपर्यंत कोकणातील तरुणांना रोजगारासाठी मुंबई–पुण्याकडे जावे लागत होते;
आता ते आपल्या गावाजवळच उद्योग-नोकरीच्या संधींचा लाभ घेऊ शकतील. - खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
उद्योगवृद्धी, निर्यात आणि बंदर कनेक्टिव्हिटीला चालना
या रेल्वे प्रकल्पामुळे —
- आंबा, काजू, मत्स्य आणि दुग्धजन्य उत्पादनांची आयात–निर्यात सोपी होणार.
- जयगड व रेडी बंदरांशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार.
- यामुळे कोकणातील दरडोई उत्पन्न अडीच लाखांवरून साडेचार ते पाच लाखांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
हा दिवस कोकणच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – राणे
टाईमबाऊंड पद्धतीने हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले. “मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेला निर्णय आजचा दिवस कोकणच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहील,” असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य करून हा उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले.

