(सातारा / वृत्तसंस्था)
कराडनजीकच्या मलकापूर शहरात रविवारी मध्यरात्री पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर कोयत्याने वार करून सुनिल नाथा चव्हाण (रा. चाफळ, ता. पाटण) या तरुणाची हत्या करण्यात आली. आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सूरज दीपक चव्हाण (रा. चाफळ, ता. पाटण) याने मित्र अक्षय सुरेश म्हेत्रे (रा. कोरेगाव, ता. सातारा) याच्या मदतीने ही हत्या केल्याची माहिती कराड शहर पोलिसांनी दिली. हत्येनंतर पसार झालेल्या दोघांना साताऱ्यातून अटक करण्यात आली आहे. मृत सुनिल चव्हाण आणि मुख्य संशयित सूरज चव्हाण हे एकाच गावातील असून त्यांची घरे एकमेकांच्या शेजारी आहेत. या घटनेमुळे पाटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल चव्हाण याचे गेल्या दोन वर्षांपासून सूरज चव्हाणच्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यांच्या संबंधांची माहिती कुटुंबीयांना झाल्यानंतर संबंधित महिलेला दुसऱ्या गावी ठेवण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ती सुनिलच्या संपर्कात होती. ही बाब सूरजला खटकत होती.
आईसोबतच्या संबंधाच्या संशयातून सूरजच्या मनात सुनिलविषयी मोठा राग निर्माण झाला होता. त्यातून त्याने मित्र अक्षयच्या मदतीने सुनिलची हत्या करण्याचा कट रचला. सुनिल कराडमधील पिझ्झा हटमध्ये नोकरी करत असल्याची माहिती दोघांना होती. त्यामुळे शनिवारी रात्री नऊ वाजताच दोघे कराडात आले आणि त्याची वाट पाहत बसले.
रात्री एकच्या सुमारास नोकरीवरून सुटल्यानंतर सुनिल मलकापूरच्या दिशेने निघाला असताना सूरज आणि अक्षय यांनी त्याला लाहोटीनगरमध्ये अडविले. त्यानंतर दोघांनी त्याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. डोक्यात आणि शरीरावर कोयत्याने वार झाल्याने सुनिलची मध्यरात्री हत्या झाली. घटनेनंतर दोन्ही आरोपी कारमधून साताऱ्याच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासाला वेग देत पोलिसांनी सूरज चव्हाण आणि अक्षय म्हेत्रे यांना साताऱ्यातून ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला कोयता आणि चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.


