(दापोली / वार्ताहर)
घराच्या अंगणातील कठड्यावर बसलेल्या वृद्धाला अचानक डुलकी लागली. तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर दुखापत झालेल्या वृद्धाचा मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. भागोजी गणू ठोंबरे (८१, रा. जालगाव-सुतारवाडी, दापोली) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही दुर्घटना ६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली होती. कठड्यावर बसले असताना डुलकी लागल्याने ठोंबरे यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
दुखापतीनंतर त्यांना ९ ऑगस्ट रोजी दापोलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी २१ ऑगस्ट रोजी त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे सलग १२ दिवस उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान १ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद दापोली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


