( मुंबई )
नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या विसर्जन वेळेवरून मोठा वाद उद्भवला आहे. तब्बल ३४ तासांनी विसर्जन पार पडलं, मात्र या विलंबामुळे आणि भाविकांना दिलेल्या कथित गैरवागणुकीमुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
यावेळी कोळी बांधवांचा पारंपरिक मान डावलला, सर्वसामान्यांशी दमदाटी केली आणि मराठा समाजाला अन्नछत्रापासून वंचित ठेवले, अशा अनेक तक्रारींनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळेच राजाने चौपाटीवरून भाविकांना “भरभरून दर्शन” दिल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली. आता मंडळावर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
फौजदारी कारवाईची मागणी
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही अनंत चतुर्दशीला म्हणजेच शनिवारी (ता. 6 सप्टेंबर) सकाळी 10 वाजता सुरू झाली. दरवर्षी ही लालबागच्या राजाचे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत विसर्जन होते. मात्र, यंदाच्या वर्षी मात्र 36 तासांनंतर म्हणजेच रविवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन झाले. पण या विसर्जनावेळी झालेल्या गोंधळावरून आता कोळी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. विसर्जनातील विलंब आणि भाविकांना दिलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी केली. या मागणीमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
समितीचे आरोप
समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मुख्यमंत्री व पोलिस अधिकाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की –
- विसर्जन मिरवणुकीला झालेल्या उशिरामुळे चंद्रग्रहणाच्या वेळी मूर्ती विसर्जन झाले, ज्यामुळे भक्तांच्या श्रद्धेला धक्का बसला.
- मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित लालबागच्या राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर भरती-ओहोटीमुळे तासन्तास अडकून होती, हे मंडळाच्या व्यवस्थापनातील दुर्लक्षाचे उदाहरण आहे.
- स्थानिक मच्छीमारांना विसर्जन करू न देता गुजरातमध्ये तयार केलेल्या तराफ्याचा वापर करून पारंपरिक मान हिरावला गेला.
- मंडळाच्या स्वयंसेवक आणि खासगी सुरक्षा रक्षकांकडून भाविकांशी गैरवर्तन करण्यात आल्याचे व्हायरल व्हिडिओंमध्ये दिसत असून, त्यात एका तरुणीशी संबंधित गंभीर घटनेचाही उल्लेख आहे.
पारंपरिक मानाचा प्रश्न
तांडेल यांनी स्पष्ट केलं की, लालबागच्या राजाची स्थापना ही मूळतः कोळी बांधवांनीच केली होती. त्यामुळे विसर्जन विधीमध्ये कोळी समाजाला पारंपरिक मान देणे आवश्यक आहे. मंडळाने या मानाला डावलले, ही बाब कोळी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, मंडळाविरोधात चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, व्हीआयपी संस्कृतीला आळा घालावा आणि दर्शन व्यवस्थेत बदल करून सामान्य भाविकांना सन्मान द्यावा, अशा ठोस मागण्या समितीने केल्या आहेत.

