(सांगली / वृत्तसंस्था)
पलूस शहरातील जुन्या बस स्थानकावर वडापाव, चहा-नाश्त्याचे छोटे हॉटेल चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या संजय तात्यासो पाटील (४५) आणि त्यांच्या पत्नी मनिषा संजय पाटील (४१) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कर्जाच्या तगाद्याला आणि घरावर आलेल्या जप्तीच्या नोटिसांना कंटाळून दोघांनी बुधवार दिनांक २ रोजी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी (६ सप्टेंबर) दोघांचाही मृत्यू झाला.
संजय आणि मनिषा यांचा सुमारे २० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अपत्य नसतानाही त्यांनी त्याचा कधीही न्यूनगंड बाळगला नाही. कष्ट, प्रेम आणि समाधानाच्या बळावर त्यांनी संसार उभा केला होता. आपल्या स्वप्नातील घरासाठी त्यांनी मार्केट यार्डातील नंदनवन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला. मात्र, घरासाठी तसेच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बँक आणि फायनान्स कंपनीकडून घेतलेली कर्जे वाढत गेली. कर्जाचे हप्ते, व्याज आणि हातउसने घेतलेल्या पैशांचा बोजा वाढत जाऊन एकूण कर्जाचा आकडा तब्बल एक कोटी रुपयांच्या घरात पोहोचला.
कर्जफेडीसाठी होणाऱ्या सततच्या तगाद्यामुळे काही दिवसांपासून त्यांनी हॉटेलही बंद केले होते. त्यातच फायनान्स कंपनी आणि बँकेकडून घर जप्तीच्या नोटिसा आल्या. घरातील साहित्य जप्त झाल्याने दोघांनाही मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी दोघांनी विषारी औषध प्राशन केले. शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने पलूसच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीच्या पुढील उपचारांसाठी त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले.
शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रकृतीत बिघाड झाला. शनिवारी मनिषा यांची प्रकृती अचानक खालावली. पत्नीची अवस्था पाहून संजय यांचाही रक्तदाब वाढला. रविवारी दुपारी मनिषा यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आणि डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर काही तासांतच संजय यांनीही प्राण सोडले.
या घटनेने पलूस शहर हादरले असून कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका कष्टकरी दाम्पत्याचा संसार उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाची नोंद पलूस पोलिसांत करण्यात आली आहे. या घटनांमुळे आर्थिक विवंचना, मानसिक ताण आणि कौटुंबिक प्रश्नांकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


