(मुंबई)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय जाहीर केला आहे. पक्षाने निवडणूक प्रचाराची पद्धत बदलत सर्व प्रचारसभा, रोड शो आणि सार्वजनिक कार्यक्रम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर पक्षाने प्रचारात कोणताही झगमगाट नको, अशी भूमिका घेतली आहे. यानुसार उमेदवारांना केवळ घरोघरी भेटी देऊन मतदारांना पत्रके वाटून साध्या पद्धतीने प्रचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादीचे प्रमुख निर्णय
– कोणत्याही प्रकारच्या जाहीर प्रचार सभा आणि रोड शो रद्द
– घरोघरी जाऊन पत्रकवाटपाद्वारे मर्यादित प्रचार
– निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणुकीवर पूर्ण बंदी
पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या जाण्याने पक्षासह राज्याचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्याप्रती आदर राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीत अजित पवार यांच्या चार प्रचार सभा नियोजित होत्या, मात्र निधनामुळे त्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता झगमगाटी प्रचाराऐवजी संयम आणि साधेपणाने निवडणूक लढवून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्धार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

