(मुंबई )
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील ५५ वर्षीय प्रकल्पग्रस्त व्यक्ती प्रकाश सावंत यांनी सोमवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयासमोर आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना घडली. दिवसाढवळ्या हायकर्टासारख्या गबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्यानं उपस्थित वकील आणि लोकांची ही घटना पाहून तारांबळ उडाली. या जाळपोळीत सावंत गंभीरपणे भाजले असून पोलिसांनी त्यांना तात्काळ जी टी रुग्णालयात दाखल केले आहे. आझाद मैदान पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून तपास सुरू आहे.
प्रकाश सावंत हे मूळचे कोकणातील कणकवली तालुक्यातील नरवडे गावातील रहिवासी आहेत. ते मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्त झाले होते. सावंत यांनी या प्रकरणाबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या; विशेषतः कणकवली तहसीलदारांनी त्यांच्याकडून ५–६ वेळा हक्कसोड घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात दुपारी लंच टाईममध्ये एचएसबीसी बँकजवळील हायकोर्टाच्या गेट क्रमांक 4 समोर ही घटना घडली. कुणाला काही कळायच्या आत एका व्यक्तीनं हातातले निषेधाचे कागद भिरकावत हातातील प्लास्टिकच्या बॉटलमधील ज्वलनशीन पदार्थ स्वत:वर ओतून घेत पेटवून घेतलं. हे दृश्य इतकं भयानक होतं की काही सेकंद आसपास उपस्थित लोकं केवळ पाहतच राहिले. त्यानंतर काहींनी तातडीनं जवळच्या हॉटेलमधील पाण्याचं पिंप नेऊन या व्यक्तीवर ओतलं आणि त्याच्या शरीरावरील आग विझवली.
सावंत यांनी २०२१ मध्ये वकिलाला ६ लाख ८० हजार रुपये दिले होते, सदर रक्कम परत मिळावी म्हणून त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडे तक्रारही दाखल केली होती. न्यायाधीशांनी वकिलाला सावंत यांना ६ लाख रुपये परत करण्यास सांगितले, मात्र उर्वरित ८० हजार रुपये अद्याप मिळाले नाहीत, असे सावंत यांनी त्यांच्या पत्रकात नमूद केले आहे.

सावंत यांच्या पत्रकानुसार, त्यांची जमीन पाटबंधारे प्रकल्पासाठी गेली असून त्यांना मोबदला मिळाला नव्हता. त्यांनी पत्रकात स्पष्ट केले होते की मोबदला न मिळाल्यास किंवा काही अनपेक्षित घटना घडल्यास त्यांची जबाबदारी राहणार नाही.
सोमवारी दुपारी प्रकाश सावंत न्यायालयात न्याय मागण्यासाठी आले होते. या दरम्यान त्यांनी स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन केले. घटनास्थळी पोलीस उपस्थित होते आणि त्यांनी तात्काळ आग विझवून सावंत यांना जी टी रुग्णालयात दाखल केले. सावंत गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आझाद मैदान पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास सुरू आहे.

