(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील कामगिरी बदल्यांच्या प्रक्रियेवरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासकीय सोय आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या कारणास्तव करण्यात येणाऱ्या या बदल्यांमध्ये नियमांचे पालन होत आहे का, असा सवाल पालक आणि नागरिकांकडून केला जात आहे.
धामणी येथील एका शिक्षकाला केंद्र क्षेत्र ओलांडून तब्बल ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरील, खाडीपलिकडील परचुरी येथील प्राथमिक शाळेवर कामगिरीवर पाठविण्यात आल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे परचुरी हे पंचायत समितीच्या सभापतींचे गाव असल्याने या नियुक्तीमागील नेमके कारण काय, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
धामणी ते परचुरी हे अंतर सुमारे ३० ते ३५ किलोमीटर असून, या प्रवासात राष्ट्रीय महामार्गासह खाडीपलीकडील भाग गाठावा लागतो. कामगिरी बदली करताना संबंधित शाळेची गरज, विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि जवळच्या शाळेतील उपलब्धता यांचा विचार केला जाणे अपेक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र, एका केंद्र क्षेत्रातून दुसऱ्या केंद्र क्षेत्रात एवढ्या दूरवर शिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याने या निर्णयाची प्रक्रिया आणि त्यामागील निकष याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
एवढ्या दूरच्या शाळेवर शिक्षकाची कामगिरी नियुक्ती करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून मंजुरी कशी मिळाली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या निर्णयामागे प्रशासकीय आवश्यकता नेमकी काय होती, तसेच संबंधित शिक्षकाची नियुक्ती विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याची चौकशी करण्याची मागणी शिक्षक, पालक आणि नागरिकांकडून होत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील विविध शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने कामगिरी बदल्या होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या सभापतींनी अशा प्रकरणांकडे लक्ष देऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, आता सभापतींच्याच गावातील शाळेत दूर अंतरावरून शिक्षकाची नियुक्ती झाल्याने या प्रकरणाकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे. याबाबत सभापतींची भूमिका काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित साधले जात आहे की प्रशासकीय अधिकारांचा वापर करून विशिष्ट शिक्षकांना सोय उपलब्ध करून दिली जात आहे, याची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.
धामणी ते परचुरी या ‘लांबपल्ल्याच्या’ कामगिरी बदली प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासन तसेच वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करावी. संगमेश्वर तालुक्यात झालेल्या अशा सर्व नियमबाह्य आणि संशयास्पद कामगिरी बदल्यांचीही तपासणी करून त्या तात्काळ रद्द कराव्यात, अशी जोरदार मागणी आता विविध स्तरांतून होत आहे.


