(नवी दिल्ली)
कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसा भोसले हिच्या विवाहावरून सुरू झालेला वाद आता आणखी तीव्र झाला आहे. मोनालिसाने फरमान खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर काही संघटनांकडून ‘लव्ह जिहाद’चा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर दोघांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले असले तरी वाद थांबलेला नाही.
दरम्यान, या प्रकरणात साध्वी प्राची आर्या यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी मोनालिसा आणि फरमान यांच्या विवाहावर तीव्र टीका करत भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात असा दावा केला. त्यांनी मोनालिसाची हत्या होईल आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे मिळतील असे म्हटले आहे.

‘हिंदू धर्म स्वीकारून लग्न केले असते तर स्वागत केले असते’
साध्वी प्राची आर्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, फरमान खानने हिंदू धर्म स्वीकारून लग्न केले असते तर त्याचे स्वागत केले गेले असते. मात्र, त्यांनी “मोनालिसासोबत लव्ह जिहाद झाला आहे” असा आरोप केलाआहे. त्यांच्या मते, मोनालिसा ही माध्यमांमुळे चर्चेत आलेली तरुणी असून तिला लव्ह जिहाद किंवा मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला.
वादग्रस्त विधानांमुळे चर्चा
मोनालिसा आणि फरमान यांच्या नात्याबद्दल बोलताना साध्वी प्राची आर्या यांनी काही अतिशय वादग्रस्त विधाने केली. भविष्यात या नात्यात मोठा दगाफटका होऊ शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले. तसेच काही पूर्वीच्या चर्चेत राहिलेल्या प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी संभाव्य धोक्याबाबत इशारा दिल्याचे सांगितले.
‘हिंदू मुलींना फसवले जाते’ असा आरोप
साध्वी प्राची आर्या यांनी असा आरोपही केला की अनेक प्रकरणांमध्ये हिंदू मुलींना फसवून विवाह केला जातो आणि नंतर त्यांना धोका दिला जातो. त्यामुळे समाजाने अशा घटनांबाबत जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मोनालिसा भोसले आणि फरमान खान यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपल्या विवाहाबाबत स्पष्टीकरण दिले होते. मात्र या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांमुळे हा विषय चर्चेत राहिला आहे.

