(जाकादेवी / वार्ताहर)
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी ५ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत लक्षवेधी मूक मोर्चा काढला. मराठा भवन, माळनाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
राज्यातील सुमारे २६ हजार पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी २००५ पूर्वी नियुक्त झालेले असून, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार ते पेन्शनसाठी पात्र आहेत, असे निवेदनातून सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी आणि सेवाज्येष्ठता यासाठी नियुक्ती दिनांकाचा विचार केला जातो. त्याच तत्त्वानुसार पेन्शनसाठीही नियुक्ती दिनांक ग्राह्य धरावा, अशी मागणी करण्यात आली.
या कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या सुरुवातीच्या काळात ८ ते १० वर्षे विनावेतन काम केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यापैकी सुमारे ८ हजार कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. गेल्या १० ते १२ वर्षांपासून त्यांना कोणत्याही प्रकारचे सेवानिवृत्ती वेतन मिळत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. सरकार सेवानिवृत्ती वेतन देऊ शकत नसेल, तर इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणीही काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सेवानिवृत्तीनंतर उदरनिर्वाहासाठी काही कर्मचारी भाजी विकणे, इमारतीवर गवंडीकाम करणे, हॉटेलमध्ये काम करणे यासारखी कामे करत असल्याचे त्यांनी सांगितले. अशी परिस्थिती सरकारसाठी भूषणावह नसल्याचे मतही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत मागण्या मान्य न झाल्यास २८ सप्टेंबरपासून लाक्षणिक उपोषण, तर २ ऑक्टोबर २०२६ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, संभाजीनगर खंडपीठ आणि कोल्हापूर सर्किट बेंच यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन देण्यात यावी, असे सकारात्मक आदेश दिले असतानाही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
मूक मोर्चा यशस्वी करण्यासाठी राज्य समन्वयक संदेश राऊत, राज्य प्रतिनिधी रामचंद्र केळकर, रत्नागिरी जिल्हा जुनी पेन्शन संघटना उपाध्यक्ष रुस्तुम मुल्ला, रविंद्र सुर्वे, रत्नागिरी जिल्हा सचिव संदेश रहाटे, जिल्हा सहसचिव महेंद्र पवार, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघटना सचिव महेश पाटकर, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी श्रीशैल्य पुजारी, रत्नागिरी तालुका अध्यक्ष प्रदीप पवार, राजापूर तालुका अध्यक्ष पी. एम. पाटील, मा. सुभाष सोकासने आणि म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.
या मूक मोर्चात जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


