(रत्नागिरी)
थंडीपासून बचावासाठी चुलीजवळ शेकोटी घेत असताना अचानक गाउनने पेट घेतल्याने गंभीररीत्या भाजलेल्या महिलेचा मुंबई येथे उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. सेजल संतोष गुरव (वय ४२, रा. चांदेराई बाजारपेठ, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात याबाबत नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास थंडी जाणवत असल्याने सेजल गुरव या घरातील चुलीजवळ शेकोटी पेटवून शेक घेत होत्या. याच वेळी अचानक त्यांच्या अंगावरील गाउनने पेट घेतला. या घटनेत त्या सुमारे ४५ टक्के भाजल्या होत्या.
कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रत्नागिरी ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

