(नवी मुंबई / वृत्तसंस्था)
नवी मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी समोर आली. महापे येथील एका लॉजमध्ये गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवल्याचे उघड झाले. आत्महत्येपूर्वी पाटील यांनी तयार केलेले व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पार्थिव स्वीकारण्यास नकार दिला असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी पत्नी आणि मुलगी रबाळे पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन आंदोलन करत आहेत.
पांडूरंग पाटील हे लवकरच निवृत्त होणार होते. त्यांच्या सेवापूर्तीसाठी केवळ एक वर्ष शिल्लक होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात असल्याचे समोर आले आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस ते घरी परतले नव्हते. त्यामुळे त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महापे येथील लॉजमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
पाटील यांच्या आत्महत्येपूर्वीचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेतल्याची माहिती आहे. यामध्ये माजी पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस उपायुक्त आणि हेड क्लार्क यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. आपल्याला झालेल्या त्रासाबाबत पाटील यांनी 8 पानी सविस्तर तक्रार लिहिल्याचाही व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे. या तक्रारीत नेमके काय नमूद करण्यात आले आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच मृत्यूपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये पाटील यांनी त्यांच्या मुलींची माफी मागितल्याचेही समोर आले आहे.
पाटील यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी त्यांच्या कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पाटील यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलीस ठाण्याला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. “अद्याप पाटील यांनी केलेला 8 पानी अर्ज आपल्याला मिळाला नाही. मात्र लवकरचं आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल,” अशी माहिती सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली आहे.


