(विल्ये / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांच्या शेतकरी, भूमिपुत्र आणि कामगारांच्या न्यायहक्कासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. वाटद-खंडाळा येथील उद्योजक शंकर घाणेकर आणि शेखरशेठ भडसावळे यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रथमेशजी गावणकर हे अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक वक्तव्यांमधून जनतेचे प्रश्न मांडणारे, प्रशासनाला जाब विचारून सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे यावेळी उपस्थितांकडून सांगण्यात आले. सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून त्यांचा हात आणि आवाज बुलंद करण्याचे काम त्यांनी केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत ते रत्नागिरीतील सर्वसामान्यांच्या आशेचा किरण ठरले असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.
जनहित फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक तथा खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, रत्नागिरीची बुलंद तोफ आणि भावी आमदार म्हणून श्री. प्रथमेश दादा गावणकर यांचा वाढदिवस आणि जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम एकत्रितपणे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित जनसमुदायाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला प्रथमेश गावणकर यांच्या मातोश्री, भाऊ, भावजयी, पत्नी, जिजाऊ सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या पदाधिकारी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
५ सप्टेंबर हा शिक्षक दिन असून याच दिवशी श्री. गावणकर यांचा वाढदिवसही असतो. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी नवीन संकल्प साकार करण्याचा निर्धार केला आहे. या संकल्पाचे उपस्थित जनसमुदायाकडून कौतुक करण्यात आले.


