(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडून शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सध्या शहरवासीयांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषत: बी. फार्मसी, डी. फार्मसी, इंजिनिअरिंग तसेच पॉलिटेक्निक महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे.
दररोज या मार्गावरून १ ते २ हजार विद्यार्थी प्रवास करतात. मात्र चंद्रावरच्या विवरांसारखी प्रचंड खोल व पाण्याने भरलेली खड्डी विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट बनून उभी ठाकली आहेत. मोटारसायकल, कार, रिक्षा अशा वाहनचालकांना या खड्ड्यांमधून मार्ग काढताना कसरत करावी लागते. त्यातच वाहनांमधून उडणारे पाणी विद्यार्थ्यांच्या गणवेशावर उडत असल्याने त्यांना शाळा-कॉलेज गाठणे हीसुद्धा मोठी शिक्षा ठरत आहे. अपघातांचा धोका कायम डोईवर असल्याने पालक व नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
ऑफ्रोट संघटनेचे जिल्हाध्यक्ष आक्रमक
स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत थेट मुख्याधिकारी गारवे यांच्याकडे तक्रार मांडली असता त्यांनी दिलेल्या प्रतिसादाने उपस्थितांचे डोळे चक्रावले. समस्येचे निराकरण करण्याऐवजी उद्धटपणे, उर्मट भाषेत उत्तर दिल्याचा गंभीर आरोप करत नगरपालिकेचा कारभार पाहण्याऐवजी ते जणू स्वतःच्या मालमत्तेसारखे वागत आहेत. सामान्य माणसांशी अवमानकारक वर्तन हे जनतेच्या सेवकाला शोभणारे नाही, अशी संतप्त टीका ऑफ्रोट संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल जोपळे यांनी केली आहे.

