( रत्नागिरी /प्रतिनिधी )
गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. रिक्षाचालकांकडून वाढीव भाडे आकारणी, सीएनजीचा तुटवडा, महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच घाटमार्गांवरील दरडी आणि अपघातांच्या संभाव्य घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची रिक्षा भाड्याच्या नावाखाली होणारी संभाव्य लूट थांबविण्यासाठी प्रत्येक रिक्षा स्टँडवर अधिकृत भाडे दरपत्रक ठळकपणे लावावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओ विभागाला दिले. रिक्षाचालकांची बैठक घेऊन मीटरची तपासणी पूर्ण करण्याची सूचनाही करण्यात आली.
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कशेडी ते खारेपाटण तसेच मिऱ्या-कोल्हापूर महामार्गाची संयुक्त पाहणी महामार्ग पोलीस, एनएचएआय, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश देण्यात आले. महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, रेडियम आणि सुरक्षा उपाययोजना कराव्यात. घाटमार्गात दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे अथवा अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्यास तातडीने मदतकार्य सुरू करता यावे, यासाठी संबंधित आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
रेल्वेच्या वेळेनुसार एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकानुसार एसटीच्या अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अचानक होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. उत्सव काळात वाहनांची संख्या वाढणार असल्याने सीएनजी पंपांवर तुटवडा अथवा गर्दीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. महावितरणनेही गणेशोत्सव काळात अखंडित वीजपुरवठा राखण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवू नयेत
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मिठाई, प्रसाद आणि खाद्यपदार्थांची विक्री होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने बाजारपेठेतील खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासावी, अशा सूचना देण्यात आल्या. नगरपरिषदा व नगरपंचायतींनी विसर्जन घाटांवर कृत्रिम जलकुंड, निर्माल्य कलश आणि आवश्यक नागरी सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवाव्यात, असेही निर्देश देण्यात आले. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेसह सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहावे, असे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले. आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही वेळी उद्भवू शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवू नयेत आणि सतत संपर्कात राहावे, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.

