(मुंबई / वृत्तसंस्था)
समुद्रात एखादी सबमरीन अडचणीत आली, खोल समुद्रात एखादी वस्तू शोधायची झाली, समुद्राखाली दुरुस्तीचे काम करायचे झाले किंवा आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन राबवायचे झाले, तर आता भारतीय नौदलाच्या मदतीला आयएनएस निपुण सज्ज आहे. भारतीय नौदलाच्या दुसऱ्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसलचा (डीएसव्ही) समावेश असलेली आयएनएस निपुण ही युद्धनौका सोमवारी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदलाच्या सेवेत दाखल झाली. नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
नैसर्गिक संकटात निपुण नेहमीच आघाडीवर
आयएनएस निपुण राष्ट्रसेवेत दाखल होत असताना ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन म्हणाले की, बदलत चाललेल्या समुद्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी निपुणमध्ये खास वैशिष्ट्ये आहेत. समुद्रात एखादी घटना घडल्यानंतर रिअल टाइममध्ये त्या घटनेची माहिती निपुणपर्यंत पोहोचेल आणि त्याच वेगाने निपुणकडून सुरक्षेसाठी किंवा बचावासाठी काम सुरू होईल, अशी अत्याधुनिक रचना आयएनएस निपुणची आहे. कोणत्याही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक संकटात निपुण नेहमीच आघाडीवर असेल, असा विश्वास ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी यावेळी व्यक्त केला.
अंडरवॉटर ऑपरेशन्ससाठी उपयोग होणार
हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने विशाखापट्टणम येथे भारतातच डिझाइन आणि बांधलेले निपुण हे केवळ एक जहाज नसून समुद्राखालील विविध ऑपरेशन्ससाठी तयार करण्यात आलेले अत्याधुनिक सपोर्ट व्हेसल आहे. डीप सी डायव्हिंग, सबमरीन रेस्क्यू, सर्च ऑपरेशन आणि अंडरवॉटर ऑपरेशन्ससाठी त्याचा उपयोग होणार आहे. सुमारे 119.4 मीटर लांब, 22.8 मीटर रुंद आणि सुमारे 10,500 टन वजनाचे निपुण 18 नॉट्स वेगाने धावू शकते.
कंट्रोल रूम म्हणजे निपुणचा ‘मेंदू’
निपुणवरील सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजे कंट्रोल रूम किंवा ऑपरेशन्स रूम. जहाजावरील विविध सिस्टीम्स, समुद्रातील परिस्थिती आणि सुरू असलेल्या मिशनवर येथून सातत्याने लक्ष ठेवले जाते. कंट्रोल रूमचे प्रमुख अधिकारी, ऑफिसर-इन-चार्ज, ऑपरेशन्स रूम यांच्या म्हणण्यानुसार, या कंट्रोल रूममधून जहाजावरील विविध सिस्टीम्सचे काम, जहाजाची स्थिती आणि सुरू असलेल्या ऑपरेशनची माहिती एका ठिकाणाहून सतत पाहता येते. कंट्रोल रूम म्हणजे निपुणचा मेंदू आहे. समुद्रात काय सुरू आहे, जहाजाची स्थिती काय आहे आणि मिशनमधील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सुरू आहे का, याची माहिती येथे सतत मिळत राहते. आधुनिक सिस्टीम्सच्या मदतीने समुद्राखाली सुरू असलेल्या ऑपरेशनवरही लक्ष ठेवता येते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. निपुणवर आजच्या काळातील अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित सिस्टिम्स बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे समुद्रातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि गरजेनुसार तातडीने निर्णय घेणे शक्य होते.
जहाजाची संपूर्ण जबाबदारी कमांडरकडे
निपुणचे कमांडिंग ऑफिसर कमांडर एल. एस. सुब्रमणियन यांच्या मते, हे जहाज वेगवेगळ्या समुद्री मोहिमांसाठी कायम सज्ज ठेवण्यात येणार आहे. निपुणची भूमिका केवळ लष्करी ऑपरेशनपुरती मर्यादित नसून समुद्रात किंवा समुद्राखाली अडचणीत सापडलेल्या व्यक्ती किंवा जहाजांना मदत करण्याची क्षमताही या जहाजाकडे आहे. निपुण वेगवेगळ्या मिशन्ससाठी कायम सज्ज असेल. लष्करी ऑपरेशन्सबरोबरच देशातील नागरिकांना समुद्रात किंवा समुद्राखाली मदतीची गरज भासली, तर सरकारच्या निर्देशानुसार आवश्यक मदत पोहोचवता येईल, असे कमांडर एल. एस. सुब्रमणियन यांनी सांगितले.
माणूस जिथे पोहोचू शकत नाही, तिथे आरओव्हीची नजर
निपुणवर रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल (आरओव्ही) आहे. हे एक मानवरहित अंडरवॉटर व्हेईकल असून ते जहाजातून रिमोटच्या मदतीने समुद्रात सोडले जाते. खोल किंवा धोकादायक ठिकाणी माणसाला थेट पाठवण्याऐवजी आरओव्हीच्या मदतीने समुद्राखालील भागाची पाहणी करता येते. सर्च, इन्स्पेक्शन आणि काही तांत्रिक ऑपरेशन्ससाठी त्याचा उपयोग होतो.
डीपसीमध्ये डायव्हर्सना पूर्ण सपोर्ट
निपुणमध्ये सॅच्युरेशन डायव्हिंग कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे डायव्हर्सना डीप सीमध्ये दीर्घकाळ काम करण्यासाठी आवश्यक सुविधा मिळतात. तसेच एअर डायव्हिंग आणि हेलिऑक्स डायव्हिंगची सुविधाही आहे. त्यामुळे समुद्राच्या वेगवेगळ्या खोलीवर आणि परिस्थितीत डायव्हर्सना काम करता येते.
सबमरीन अडचणीत आली तर निपुण मदतीला
निपुणची सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे सबमरीन रेस्क्यू. समुद्राखाली सबमरीन अडचणीत आल्यास रेस्क्यूसाठी आवश्यक इक्विपमेंट आणि टीम घटनास्थळी नेण्याचे काम निपुण करू शकते. जहाजावर मोठा वर्किंग डेक आणि क्रेन आहेत. त्यांच्या मदतीने समुद्रात आवश्यक रेस्क्यू इक्विपमेंट उतरवता येते. डायव्हर्ससाठी सेल्फ प्रोपेल्ड हायपरबॅरिक लाइफबोट (एसपीएचएल) ही विशेष लाइफ सेव्हिंग सुविधा आहे. इमर्जन्सीच्या वेळी डायव्हर्सना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तिचा उपयोग होतो.
हेलिकॉप्टरसाठी स्वतंत्र डेक
निपुणवर हेलिकॉप्टर डेक आहे. त्यामुळे गरज पडल्यास हेलिकॉप्टरच्या मदतीने कर्मचारी, इक्विपमेंट किंवा आवश्यक साहित्य जहाजापर्यंत पोहोचवता येते. जहाजावर आठ खाटांचे हॉस्पिटल असून, त्यात टेलिमेडिसिन आणि ऑपरेशन थिएटरची सुविधाही आहे. समुद्रात मिशनदरम्यान मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाल्यास तातडीची वैद्यकीय मदत देता येणार आहे. निपुणवर डायनॅमिक पोझिशनिंग सिस्टिम (डीपी) आहे. या सिस्टीममुळे अँकर न टाकताही जहाजाला समुद्रातील एका ठराविक ठिकाणी स्थिर ठेवता येते. डीप सी डायव्हिंग, आरओव्ही ऑपरेशन किंवा रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना जहाजाची पोझिशन कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे ही सुविधा अशा मिशन्ससाठी विशेष उपयोगी ठरणार आहे.
लष्करी ऑपरेशनबरोबर नागरिकांनाही मदत
निपुणचा उपयोग केवळ भारतीय नौदलाच्या लष्करी ऑपरेशन्सपुरता मर्यादित राहणार नाही. समुद्रात एखादी इमर्जन्सी निर्माण झाली किंवा नागरिकांना मदतीची गरज भासली, तर सरकारच्या निर्देशानुसार निपुणचा वापर रेस्क्यू आणि सपोर्ट ऑपरेशन्ससाठी करता येणार आहे. कमांडर एल. एस. सुब्रमणियन यांच्या मते, समुद्रातील वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी आणि गरजेनुसार तातडीने मदत पोहोचवण्यासाठी निपुण कायम तयार ठेवले जाईल.
निस्तारनंतर आता निपुण
निपुण हे निस्तार क्लासमधील दुसरे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आहे. याआधी या क्लासमधील आयएनएस निस्तार भारतीय नौदलात दाखल झाले आहे. आता निपुणच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची डीप-सी डायव्हिंग, सबमरीन रेस्क्यू आणि अंडरवॉटर ऑपरेशन्सची क्षमता आणखी मजबूत झाली आहे. भारतानेच डिझाइन करून भारतातच बांधलेले हे जहाज देशाच्या वाढत्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरतेचे उदाहरण आहे. ‘फार बिनीथ, फ्यू बियॉन्ड’ हे निपुणचे ब्रीदवाक्य असून ‘निश्चय–निर्भय–निपुण’ हा त्याचा संदेश आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर दिसणारे निपुण मोठे जहाज असले, तरी त्याची खरी ताकद समुद्राच्या तळाशी आहे. डीपसीमध्ये डायव्हर्सच्या मदतीपासून सबमरीन रेस्क्यूपर्यंत, अंडरवॉटर सर्चपासून नागरिकांच्या मदतीपर्यंत आयएनएस निपुण आता राष्ट्रसेवेसाठी सज्ज झाले आहे.

