(मुंबई/ वृत्तसंस्था)
एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून राज्य शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना NCMC कार्डच्या माध्यमातूनच सवलतीचे तिकीट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशांनी प्रवास करताना NCMC कार्ड सोबत ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केले आहे.
महामंडळाच्या परिपत्रकानुसार, शासनाच्या निर्देशानुसार विविध सामाजिक घटकांना एसटी प्रवासात सवलत दिली जाते. या सवलतीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी संबंधित प्रवाशांसाठी NCMC कार्डची नोंदणी आणि वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची NCMC कार्ड नोंदणी व वितरणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या NCMC कार्डची नोंदणी व वितरणाचे काम सुरू असून, त्यानंतर इतर सवलतधारक प्रवाशांसाठीही ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
१ सप्टेंबरपासून NCMC कार्ड आवश्यक
१ सप्टेंबर २०२६ पासून एसटी महामंडळाकडून देण्यात आलेले NCMC कार्ड ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी सवलतीचा लाभ घेण्याकरिता आवश्यक असणार आहे. या तारखेपासून शासनाच्या सवलतीचा लाभ घेताना सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच वितरित केले जाणार आहे.
संबंधित प्रवाशांनी NCMC कार्डमध्ये आवश्यक रक्कम Top-up करून ठेवणेही आवश्यक आहे. याबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) संबंधित एसटी आगारांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी कार्डची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घेण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना काही काळ मुदतवाढ
७५ वर्षांवरील ‘अमृत ज्येष्ठ नागरिकां’च्या NCMC कार्ड नोंदणी प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी येत आहेत. विशेषतः हाताचे ठसे न उमटण्याच्या समस्येमुळे या प्रवाशांसाठी NCMC कार्डची सक्ती तातडीने लागू न करता काही काळ मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून NCMC कार्डची नोंदणी व वितरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच कार्डमध्ये आवश्यक रक्कम Top-up करून ठेवावी, जेणेकरून १ सप्टेंबरपासून सवलतीच्या प्रवासावेळी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

