(यवतमाळ / वृत्तसंस्था)
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मुसळधार पावसामुळे कुपटी नदीला आलेल्या पुरात एक इर्टिगा कार वाहून गेल्याने आई आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेत पती अविनाश खंडारे झाडाचा आधार घेत बचावले, मात्र त्यांच्या डोळ्यांसमोर पत्नी आणि दोन्ही मुली पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. या घटनेनंतर “माझी प्रॉपर्टी घ्या, पण पुलावर दिशादर्शक फलक लावा,” असा त्यांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्णी तालुक्यातील लोणी येथील रहिवासी अविनाश नामदेव खंडारे हे पत्नी माधवी खंडारे (40), मुलगी साची (17) आणि प्राची (12) यांच्यासह गुरुवारी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी राळेगाव येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर नातेवाईकांना बोरीअरब येथे सोडून हे कुटुंब रात्री उशिरा दारव्हा मार्गे आपल्या घरी परतत होते.
गुरुवारी मध्यरात्री सुमारे 12.30 वाजता दहिली गावाजवळील कुपटी नदीच्या पुलावर त्यांची कार पोहोचली. मुसळधार पाऊस, अंधार आणि पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अचूक अंदाज न आल्याने कारने पुलावर प्रवेश केला. मात्र काही क्षणांतच पुराच्या प्रचंड प्रवाहाने कारला वेढले आणि ती पाण्यात वाहून गेली.
‘आम्हाला वाचवा…’ हा ठरला शेवटचा फोन
धोक्याची जाणीव होताच अविनाश आणि त्यांच्या पत्नीने नातेवाईकांना फोन करून मदतीसाठी आर्त हाक दिली. “आम्ही पुरात अडकलोय… आम्हाला वाचवा,” एवढेच शब्द उच्चारले गेले आणि काही क्षणांतच कारचा संपर्क तुटला. त्यानंतर ती पुराच्या पाण्यात अदृश्य झाली.
झाडाचा आधार मिळाला, पण संसार वाहून गेला
कार वाहून जात असताना अविनाश खंडारे यांना एका झाडाचा आधार मिळाला. त्यांनी जीवाच्या आकांताने झाडाला धरून स्वतःचा जीव वाचवला आणि मदतीसाठी आक्रोश केला. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने पहाटे सुमारे चार वाजता त्यांची सुखरूप सुटका केली. मात्र त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलींचा काहीच पत्ता लागला नव्हता.
12 तासांच्या शोधानंतर कार सापडली, तिघींचे मृतदेह आतच
रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर शुक्रवारी दुपारी घटनास्थळापासून सुमारे 300 मीटर अंतरावर पुराच्या पाण्यात अडकलेली कार सापडली. बचाव पथकाने कार बाहेर काढून तपासणी केली असता, त्यामध्ये माधवी खंडारे, साची आणि प्राची यांचे मृतदेह आढळून आले. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
‘माझी प्रॉपर्टी घ्या, पण पुलावर फलक लावा’
या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. दारव्हा-आर्णी मार्गावरील पुलाजवळील रस्त्याचे काम अपूर्ण असून पुलावर मोठे खड्डे आहेत. तसेच पुराच्या काळात वाहनचालकांना सावध करणारे दिशादर्शक किंवा इशारा फलक नसल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला. या वेदनादायी प्रसंगानंतर अविनाश खंडारे यांनी पालकमंत्र्यांसमोर “माझी प्रॉपर्टी घ्या, पण पुलावर दिशादर्शक फलक लावा. दुसऱ्या कोणाचं कुटुंब माझ्यासारखं उद्ध्वस्त होऊ नये,” अशी भावनिक विनंती केली.
पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली, मात्र अंधार आणि मुसळधार पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आणि दुपारी तिन्ही मृतदेह हाती लागले. या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, पुलावरील सुरक्षाव्यवस्था, अपूर्ण रस्त्याचे काम आणि इशारा फलकांच्या अभावाची तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
हसण्या-खेळण्याने गजबजलेल्या खंडारे कुटुंबावर एका रात्रीत दुःखाचा डोंगर कोसळला. आई आणि दोन मुलींच्या निधनामुळे लोणी गावासह संपूर्ण आर्णी आणि दारव्हा परिसरात शोककळा पसरली असून, या दुर्घटनेनंतर पुलांवरील सुरक्षाव्यवस्था आणि पुरकाळातील खबरदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

